कल्याण बाजार समिती निवडणुकीची प्रक्रिया रामभरोसे; निवडणूक लांबणीवर टाकल्यास तीव्र आंदोलन करणार, शरद पवार गटाचा इशारा

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कल्याण बाजार समिती निवडणुकीची प्रक्रिया रामभरोसे; निवडणूक लांबणीवर टाकल्यास तीव्र आंदोलन करणार, शरद पवार गटाचा इशारा

LOKSANDESH NEWS 





 कल्याण बाजार समिती निवडणुकीची प्रक्रिया रामभरोसे; निवडणूक लांबणीवर टाकल्यास तीव्र आंदोलन करणार, शरद पवार गटाचा इशारा 




कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ एप्रिल २०२४ मध्येच संपुष्टात आला असतानाही, निवडणूक प्रक्रियेत होत असलेल्या दिरंगाईमुळे व्यापारी, शेतकरी आणि माथाडी कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा उपनिबंधक किशोर मांडे यांनी २७ फेब्रुवारी २०२५ रोजी अधिसूचना जारी करून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती. मात्र, २५ मार्चपर्यंत अंतरिम मतदार यादी जाहीर होणे अपेक्षित होते. एप्रिल महिना सुरू होऊनही निवडणुकीबाबत कोणतीही ठोस हालचाल झाली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणूक प्रक्रियेत होत असलेल्या विलंबाबाबत व्यापारी आणि शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे पदाधिकारी प्रशांत माळी यांनी प्रशासन आणि संबंधित खात्यावर गंभीर आरोप करत, निवडणूक पुढे ढकलण्याचे प्रयत्न होत असल्याचे सांगत जर वेळेत निवडणुका झाल्या नाहीत, तर व्यापारी आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा प्रशासनाला दिला आहे. 

       ठाणे जिल्ह्यातील महत्वाच्या असलेल्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाचा ५ वर्षांचा कालावधी सन २०२४ रोजीच संपुष्टात आला होता. मात्र, त्यांनतर आलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी राज्याच्या पणन विभागाने संचालक मंडळाला सहा महिन्यांची दोनदा मुदतवाढ देऊन तब्बल १ वर्षाचा कालावधी विद्यमान संचालकांनी आपल्या पदरी पाडून घेतला.

 या वाढीव मुदतीचा कालावधी २१ एप्रिल २०२५ रोजी संपुष्टात येणार असल्याने, जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किशोर मांडे यांनी २७ फेब्रुवारी २०२५ रोजी अधिसूचना काढून संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली. तसेच हरकती, सूचनांवर निर्णय घेऊन त्यांनीच काढलेल्या अधिसूचनेनुसार २५ मार्च २०२५ रोजी अंतरिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, आता एप्रिल महिना उजाडला तरी अंतरिम मतदार यादी प्रसिद्ध होऊन, निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित होते. दरम्यान, राजकीय अट्टाहासापोटी बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असताना, अगदी ३ महिन्यांच्या कालावधीसाठी सभापती व उपसभापती निवडणूक प्रक्रिया पार पाडून सभापती पदी दत्ता गायकवाड व उपसभापती पदी गजानन पाटील विराजमान झाले. या सर्व प्रक्रिया पूर्ण होत असताना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक यांनी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार २५ मार्च २०२५ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे क्रमप्राप्त होते. मात्र, आपल्याच अधिसूचनेचा विसर जिल्हा प्रशासनाला पडल्याचे दिसून येत आहे. कारण अद्याप अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली नसल्याने व निवडणूक कार्यक्रम जाहीर न केल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण झाले आहे.

 आत्ता निवडणूक बाबतच्या हालचाली मंदावल्याने शेतकरी, व्यापारी व माथाडी आदी घटकांनी पणन विभाग व जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेबाबत उलट सुलट चर्चा सुरू करत संतप्त भावना उपस्थित करत आहे. तर या निवडणुकीबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी प्रशांत माळी यांनी प्रशासन आणि संबंधित खात्यावर गंभीर आरोप करत, निवडणूक पुढे ढकलण्याचे प्रयत्न होत असल्याचे सांगत जर वेळेत निवडणुका झाल्या नाहीत, तर व्यापारी आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून आंदोलन करतील आणि याला जबाबदार संबंधित प्रशासन असेल असा इशारा दिला आहे. या मुळे बाजार समितीची ही निवडणूक आता वादग्रस्त ठरत आहे.





 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली