जेलमधून सुटल्यावर पुन्हा एक हत्या; आंबिवलीत ७४ वर्षीय महिलेचा खून करून दागिने लंपास
जेलमधून सुटलेला आरोपी पुन्हा अपराधाच्या वाटेवर... व्यवसायासाठी पैसे हवे होते म्हणून वृद्धेचा जीव घेतला. पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करत खून करून दागिने लंपास... खडकपाडा पोलिसांच्या तपासातून आरोपी गजाआड.
कल्याणच्या आंबिवली परिसरात राहणाऱ्या ७४ वर्षीय रंजना पाटकर यांची हत्या करून त्यांचे सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या गुन्हेगाराला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. चांद उर्फ अकबर शेख (३०) असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव असून, तो यापूर्वीही हत्या प्रकरणात दोषी आढळून कारागृहात होता. चांगली वर्तणूक असल्यामुळे त्याला काही महिन्यांपूर्वी सुटका देण्यात आली होती. जेलमधून सुटल्यानंतर तो आंबिवलीमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होता. मात्र, मोमोज विक्रीसाठी व्यवसाय सुरू करायचा असल्याने पैशांची गरज होती.
त्यामुळे त्याने काही दिवस रंजना पाटकर यांच्या घराची रेकी केली. २० मार्च रोजी आरोपीने पाणी मागण्याच्या बहाण्याने वृद्धेच्या घरी प्रवेश केला. टीव्हीचा आवाज वाढवून त्याने आरडाओरडा ऐकू येऊ नये याची काळजी घेतली आणि नंतर महिलेचा गळा दाबून खून केला. तिच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील कर्णफुले मिळून सुमारे १.०५ लाखांचे दागिने लंपास केले. याप्रकरणी मयतच्या कुटुंबाचा दुसऱ्या वरती संशय होता. त्यामुळे पोलिसांनी एक संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याला न्यायालयात हजर केले व सध्या तो कल्याण आधारवाडी जेलमध्ये आहे.
मात्र, यादरम्यान पोलिसांनी परिसरात असलेल्या गुन्हेगारीवरती पाळण ठेवत 100 पेक्षा अधिक लोकांची माहिती गोळा करत पोलिसांच्या गुप्त माहितीदाराने दिलेल्या माहितीवरून खऱ्या आरोपीचा छडा लावण्यात आला. आरोपीकडून चोरीस गेलेला मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. ही हत्या आणि जबरी चोरी उघडकीस आणणाऱ्या खडकपाडा पोलिसांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले असून, या गुन्ह्यातील तपास अधिक सुरु आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली