रिलायन्स नागोठणे कंपनी विरोधातील आंदोलनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पाठिंबा
रिलायन्स नागोठणे कंपनी संलग्न बेणसे झोतीरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्प उभारला जात आहे. अशातच येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी वाचविण्यासाठी तसेच शेतजमिनीकडे जाणारे मार्ग कायम ठेवण्यासाठी व इतर न्यायिक मागण्या घेऊन संविधानिक व लोकशाही मार्गाने पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आपल्या न्याय हक्कासाठी येथील स्थानिक, शेतकरी, पशुपालक, मच्छिमार, भूमिपुत्र यांनी बेणसे सिध्दार्थनगर पाण्याच्या टाकीलगत आमरण उपोषण सुरू केले आहे.
या आंदोलनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते, संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी आमरण उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. तसेच आमरण उपोषणास बसलेल्या बेणसे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच स्मिता यशवंत कुथे, कल्पना बबन अडसुळे, योगेश मंगेश अडसुळे, सचिन गणपत कुथे यांच्या तब्येतीची विचारपूस करून पेण तहसीलदार तानाजी शेजाळ यांना तातडीने कार्यवाही करण्याबाबत सुचविले. तसेच रिलायन्स नागोठणे कंपनी विरोधात रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर लवकरच विराट मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील शिवसेना नेते प्रसाद भोईर यांनी यावेळी दिला.
उपोषणकर्त्यांना दिवसेंदिवस विभागातील शेतकरी व स्थानिक भूमिपुत्रांचा पाठिंबा वाढत आहे. त्यामुळे या आंदोलनाला प्रचंड बळ मिळाले आहे. जोपर्यंत स्थानिक जनतेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत तोपर्यंत काम बंद ठेवावे, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचे आमरण उपोषण सुरूच राहील. असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली