भिषण पाणीटंचाईने सर्वतीर्थ टाकेदमधील बांबळेवाडी होरपळली; महिलांची प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी
इगतपुरी तालुका कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघातील सर्वतीर्थ टाकेद येथील बांबळेवाडी शिवारात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
जलजीवन मिशनच्या योजनेंतर्गत उभारलेल्या टाक्यांत आणि नळांमधून पाणीपुरवठा पूर्णतः बंद असल्याने महिलांना आणि ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गावकऱ्यांना स्वखर्चाने पाण्याचे टँकर मागवून तहान भागवावी लागत असून एका 200 लिटरच्या प्लास्टिक ड्रमसाठी 100 ते 200 रुपये मोजावे लागत आहेत. पाणी मिळवण्यासाठी महिलांना एक ते दीड किलोमीटर अंतर पायी चालत, एका शेतातील खाजगी विहिरीतून पाणी भरावे लागत आहे. मात्र, ही विहीरही आटत चालल्यामुळे लवकरच गावकऱ्यांना 6 किमी अंतरावरील सर्वतीर्थ येथून पाणी आणावे लागणार आहे.
प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असून, तात्काळ टँकरने किंवा अन्य माध्यमातून नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी महिलांनी जोरदारपणे केली आहे. ह्या गावातील परिस्थितीवर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी आता तीव्र होत आहे.