LOKSANDESH NEWS
चंद्रपुरात महाकालीच्या चैत्र यात्रेला सुरुवात
चंद्रपूरच्या देवी महाकाली यात्रेला आज घटस्थापनेने प्रारंभ झाला. महाकालीची यात्रा चैत्र शुद्ध षष्ठी पासून वैशाख पौर्णिमेपर्यंत चालते. या साधारण महिनाभरात चार राज्यातून लाखो भाविक चंद्रपुरात देवी दर्शनासाठी दाखल होतात. चैत्र नवरात्रोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठवाड्यातून मोठ्या संख्येत भाविक दर्शनाला येतात. यात्रेला देवीभक्तांची प्रचंड गर्दी उसळली.
नाचणारे पोतराज आणि मळवट भरलेल्या महिला भक्तांनी मंदिर परिसर फुलून गेलाय. चंद्रपुरात उन्हाचा जोरदार तडाखा आहे. त्यादृष्टीने मंडप आच्छादन, पेयजल, आरोग्य, निवास आदींसह मंदिर व्यवस्थापन व जिल्हा प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी मूलभूत सुविधा केल्या आहेत.
घटस्थापना आणि महाआरतीनंतर आज मंदिरात भाविकांच्या दर्शन प्रवेशाला सुरुवात झाली.
माता महाकाली यात्रेला येणाऱ्या भाविकांची गर्दी बघता कायदा व सुव्यवस्था च्या प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तीन नियंत्रण कक्ष ठेवण्यात आले असून, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी दिली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली