सुकडी डाकराम येथे पाणीटंचाईच्या समस्येत वाढ; नळ योजनेचे काम अर्धवट असल्याने महिलांची पाण्यासाठी पायपीट
गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील सुकडी डाकराम येथील नळ योजनेचे काम गेल्या वर्षभरापासून पूर्ण झाले नाही. त्यामुळे येथील गावकऱ्यांना पाणीटंचाईच्या तीव्र समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
सुकडी डाकराम येथे अनेक वर्षांपासून गावकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी नळ योजनेच्या माध्यमातून मिळत होते. पण केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत हर घर जल ही योजनेअंतर्गत नळ योजना राबविण्यात आली. या अंतर्गत येथे नळ योजना मंजूर करण्यात आली. गेल्या वर्षीपासून या योजनेचे काम सुरू करण्यात आले. पण वर्षभरात या योजनेचे केवळ 20 टक्केच काम पूर्ण झाले आहे. या योजनेचे काम भंडारा जिल्ह्यातील एका कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहे. सदर कंत्राटदाराने नळ योजनेचे काम अर्धवट केले आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
सुकडी डाकराम येथील पाणी पुरवठा दोन दिवसांत सुरळीत करा अन्यथा विरोधात जि.प. वर घागर मोर्चा काढण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. सुकडी डाकराम येथील नळ योजनेचे काम अर्धवट असल्याने गावातील महिलांना पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत आहे. तर काही गावकऱ्यांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. नळ योजनेच्या कामासाठी गावातील रस्ते खोदून ठेवल्याने गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार करण्यात आली, पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही.
त्यामुळे याची दखल संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सरपंच सुनील मेश्राम यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीतून केली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली