शेगावात ऑटोची प्रीपेड सेवा सुरू, जिल्हा अधीक्षकांच्या संकल्पनेतून उपक्रमाला सुरुवात
संत नगरी शेगावात राज्यातच नव्हे तर देशभरातून भाविक भक्त संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येतात. या ठिकाणी ऑटो चालकांशी वाद विवाद होऊ नये किंवा भक्तांना कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने शेगावात प्रायोगिक तत्त्वावर ऑटोची प्रीपेड सेवा सुरू केली आहे.
पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या संकल्पनेतून त्यांच्याच हस्ते या सेवेचे लोकार्पण आज गुरुवारी शेगावच्या रेल्वे स्थानकावर झाले.
शेगाव येथील रेल्वे स्थानकामधून या प्रीपेड ऑटो सेवेचा लाभ भक्तांसह शहरातील नागरिकांना घेता येणार आहे. रेल्वे स्टेशन ते संत गजानन महाराज मंदिर प्रतिव्यक्ती दहा रुपये तर आनंद सागर व शहरातील इतर ठिकाणी वीस रुपयाचे दर ठेवण्यात आले आहे.
शेगावातील ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर असून हा उपक्रम जिल्ह्यातील इतर शहरांमध्ये हे राबविल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी आपल्या भाषणातून दिली. या कार्यक्रमाला अप्पर पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा, शेगावचे ठाणेदार नितीन पाटील, पोलीस सहाय्यक निरीक्षक सोनटक्के,यांनीही ऑटो चालकांना मार्गदर्शन केले. ऑटो प्रीपेड सेवेचा लाभ भाविकांसह प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांनी केले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली