श्रमिक मंडळ संचलित संस्थेतील आदिवासी व मागासवर्गीय शिक्षकांवरील अन्यायाविरोधात जि. प. ठाणे शिक्षण विभाग कार्यालयासमोर शिक्षकांचे आमरण उपोषण P
भिवंडीत श्रमिक मंडळ, भिवंडी संचलित संस्था अध्यक्ष मधुकर पाटील आणि जिल्हा परिषद ठाणे (माध्यमिक शिक्षण विभाग) यांनी आदिवासी व मागासवर्गीय शिक्षकांवर अन्याय केल्याचा आरोप करत शिक्षकांनी जिल्हा परिषद ठाणे येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शिक्षकांना नोकरी व वेतन मिळण्यात विलंब होत असल्याचा आरोप करत ही आंदोलनाची भूमिका घेण्यात आली आहे.
शिक्षकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये 2013-2025 या कालावधीसाठी शिक्षक नामावली तातडीने अद्ययावत करून प्रकाशित करावी, ही मुख्य मागणी आहे. तसेच, 15 जून 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरू असूनही अद्याप कोणतेही नियुक्तीपत्र संबंधित शाळांना देण्यात आलेले नाही. त्यामुळे तात्काळ नियुक्तीपत्रे जारी करावीत, अशी मागणी करण्यात येत आहे. याशिवाय, 2013 पासून वेतन न मिळालेल्या शिक्षकांना तातडीने वेतन मिळावे, तसेच शिक्षणाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय द्यावा,
अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या मागण्यांसाठी शिक्षक नंदुलाल दशरथ वरठा आणि राठोड गजानन उत्तम यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. जिल्हा परिषद ठाणे शिक्षण विभाग (माध्यमिक) कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, व शाळेतील कर्मचाऱ्यावर मुख्याध्यापक व संस्था अध्यक्ष यांचा होणाऱ्या जुलमी त्रासा बाबत सखोल चौकशी व्हावी अशी शिक्षक संघटनांची मागणी आहे.
शिक्षकांच्या रोजगार आणि वेतनासारख्या गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाने त्वरित लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही शिक्षकांनी दिला आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली