चिपळूण:
चिपळूण तालुक्यातील तोंडली – वारेली परिसरात शनिवारी मध्यरात्री एका शेतकऱ्याने बिबट्याशी झटापट करत स्वतःचा आणि आपल्या पाळीव कुत्र्याचा जीव वाचवला. या संघर्षात बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.
तोंडली – वारेली गावच्या सीमेवर राहणारे आशिष शरद महाजन (वय ५५) हे शेतकरी शनिवारी रात्री साडेअकरा वाजता त्यांच्या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकून घराबाहेर पडले. घराबाहेर येताच त्यांनी कुत्र्याच्या दिशेने येणारा बिबट्या पाहिला. कुत्र्याला वाचवण्यासाठी महाजन यांनी धाव घेतली असता बिबट्याने थेट महाजन यांच्यावरच हल्ला चढवला.
या झटापटीत बिबट्याने महाजन यांच्या दोन्ही पायांवर, उजव्या हातावर, तोंडावर आणि डोक्यावर गंभीर जखमा केल्या. रक्तस्राव होत असतानाही महाजन यांनी धैर्य राखत बिबट्याला जमिनीवर आपटले. हा संघर्ष पाहून महाजन यांच्या पत्नी सुप्रिया महाजन यांनी धाव घेतली आणि त्यांनी टोकदार भाला पतीच्या हाती दिला. भाल्याने महाजन यांनी बिबट्याच्या मानेवर आणि छातीत वार करत त्याचा अंत केला.
घटनेची माहिती मिळताच विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी सरवर खान आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तपासणी दरम्यान मृत बिबट्या मादी जातीची असून अंदाजे वय १.६ ते २ वर्ष असल्याचे स्पष्ट झाले. वन विभागाने बिबट्याचे शव ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.
या घटनेमुळे तोंडली – वारेली परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, शेतकरी महाजन यांच्या धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली