राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागाला न्याय देणारा अर्थसंकल्प :आमदार सुधीरदादा गाडगीळ
सांगली, दि.१०: राज्यातील शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही विभागांना न्याय देणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज विधिमंडळात सादर केला आहे. या अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे राज्यातील रोजगार निर्मितीला चालना मिळेल. ग्रामीण भागाला चांगला न्याय मिळेल याची खात्री वाटते अशी प्रतिक्रिया आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी व्यक्त केली.
आमदार गाडगीळ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची धोरणे आणि विकासाचाविचार यांना प्राधान्य या अर्थसंकल्पात देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना प्रामुख्याने यामध्ये जास्तीत जास्त लाभ कसा होईल याकडे लक्ष देण्यात आले आहे. त्याचबरोबर घर बांधणी या विषयाला सुद्धा प्राधान्य दिले आहे. प्रामुख्याने मेक इन इंडिया प्रमाणेच मेक इन महाराष्ट्र यालाही अर्थसंकल्पात प्राधान्य दिलेले आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
दावोस येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत जे महाराष्ट्रातील उद्योग वाढी संदर्भात करार झाले त्याचेही प्रतिबिंब या अर्थसंकल्पात निश्चितपणे उमटलेले आपल्याला दिसते. मेक इन महाराष्ट्र या धोरणामुळे निश्चितच महाराष्ट्रातील उत्पादनामध्ये वाढ होईल. महाराष्ट्र स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने गती घेईल आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल यात शंका नाही.
संकल्पमध्ये तीर्थक्षेत्र विकास, पर्यटन विकास, रस्ते,घर बांधणी याला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागांचा विकास होण्यास निश्चितच मदत होणार आहे. एकूणच संपूर्ण राज्याचे भवितव्य अधिक समृद्ध करण्यासाठी हा अर्थसंकल्प निश्चितच मदत करेल यात शंका नाही, असेही आमदार गाडगीळ म्हणाले.