फळांच्या राजाची प्रतीक्षा संपली; सिंधुदुर्गातील बाजारपेठांमध्ये आंबा दाखल
उन्हाळ्याची चाहूल लागताच खव्वय्यांना आंब्याचे वेध लागतात. मार्च-एप्रिलपासून स्थानिक बाजारात आंबे येण्यास सुरुवात होतात. परंतु, सुरुवातीला आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात.
त्यामुळे खव्वय्यांना आंब्यासाठी एप्रिल महिन्याची वाट पाहावी लागते. दरवर्षी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून आंब्याच्या होणाऱ्या काढणीमुळे स्थानिक बाजारात आंबा थोडा उशिराच दाखल होतो. मात्र, यावर्षी सिंधुदुर्गात बाजारपेठांमध्ये आंबा दाखल झाला असून आंब्याची प्रतीक्षा आता संपली आहे.
हापूस, पायरी जातीचे आंबे दाखल झाले असून १४०० रु. ते १५०० रु. प्रतिडझन दर सांगितला जात आहे.
आंब्याचे मोठे मार्केट असलेल्या मुंबई, पुणे बाजारात काही दिवसांपूर्वी आंब्याची पहिली पेटी दाखल झाली होती. त्याला उच्चांकी दर मिळाला होता. यावर्षी आंब्याला मोहोराने दगा दिला आहे. केवळ ३० ते ४० टक्केच आंबा उत्पादन झाले आहे. बदलत्या हवामानाने हा घात केला आहे. तिसऱ्या टप्प्यातील मोहोरही गायब झाला. यामुळे हापूस आंब्याचे दर १४०० ते १५०० असे चढते आहेत.
मात्र, मे महिन्यात आंबा ४०० ते ५०० रुपये डझन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना स्वस्तात आंबा उपलब्ध होण्यासाठी मे महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.