साक्री तालुक्यातील जीरापुर चिकसे शिवारात बिबट्याचा धुमाकूळ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
साक्री तालुक्यातील चिकसे जिरापुर शिवारात काल रात्री प्रल्हाद पुंडलिक पवार यांच्या गटखळ नदी तीरावर असलेल्या राहत्या घराजवळील वाड्यातील सहा शेळ्यांवर या बिबट्याने हल्ला चढवला. यात जागेवर तीन शेळ्या फस्त केल्या तर तीन शेळ्या वाड्यातून उचलून नेल्या. त्या शेळ्यांचाही अद्याप तपास लागलेला नाही. त्यामुळे चिकसे जीरापुर शिवारात रात्रीच्या शेतीला पाणी भरण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या शिवारात बिबटचे नर-मादी व एक पिल्लू असल्याचे दिसून आले आहे. यासाठी शिवसेनेतर्फे वन खात्याला निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार वनविभागाचे वनपाल संदीप मंडलिक, वनरक्षक अधिकार पदमोर, अमोल पवार, सुमित कुवर, लखन पावरा यांनी गेल्या दोन दिवसांपासून या शेत शिवारात स्वता गस्त घातली असून, त्यांना एक नर आणि मादी बिबट त्यांच्या कॅमेरात कैद झाले आहे तर एक पिल्लू चुकले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, काल रात्री चिकसे गावाला लागून गटकळ नदी तीरावर जीरापुर शिवारात प्रल्हाद पुंडलिक पवार यांच्या शेतातील वाड्यातील सहा शेळ्या या बिबट्यांनी फस्त केले.
यातील दोन शेळ्या या गर्भवती होत्या. जागेवर तीन शेळ्यांचा फडशा पाडला तर तीन शेळ्या उचलून नेल्या. त्यामुळे चिकसे व जिरापुर शिवारात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा विज नसल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी जावे लागते. मात्र, या हिंस्र प्राण्यांमुळे आता शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली