LOKSANDESH NEWS
ठाणे ग्रामीण जिल्ह्याकरिता "डिजिटल व्हॅन", डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार
ठाणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आपले पोलीस, ठाणे ग्रामीण पोलीस अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाची आज पासून सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत ठाणे ग्रामीण जिल्ह्याकरिता एक पोलीस डिजिटल व्हॅन सुरु करण्यात आली असून, या डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गाव खेड्यात जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे.
ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये एकूण ७४१ गावे असून ही पोलीस डिजिटल व्हॅन जिल्ह्यातील दुर्गम गावे, आदिवासी पाडे, खेडेगावे अशा ठिकाणी पथनाट्य आणि एनिमेशन शॉर्ट फिल्मद्वारे जनजागृती व प्रबोधन केले जाणार आहे. तसेच नवीन कायद्याविषयी जागृकता भारतीय न्याय कायदा, भारतीय नागरिक सुरक्षा कायदा, भारतीय साक्ष कायदा, लोकाभिमुख कायद्याची माहिती आणि जनजागृती करण्याचे काम या पोलीस डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
ही पोलीस डिजिटल व्हॅन ठराविक दिवसानुसार त्या त्या गावांमध्ये, खेड्यापाड्यांमध्ये, आदिवासी वस्त्यांमध्ये, शाळांमध्ये जाऊन अंधविश्वास, बालविवाह, लैंगिक अत्याचार अशा घटना रोखण्याकरिता व ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारी प्राथमिक स्वरूपात दाखल करून घेणार आहे. या पोलीस डिजिटल व्हॅन मध्ये तीन ते चार महिला पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी नागरिकांच्या तक्रारीचे निवारण व प्राथमिक स्वरूपात तक्रार लिहून घेण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. या पोलीस डिजिटल व्हॅनमुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांना तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जावं लागणार नसून त्यांच्या तक्रारीचे निवारण या पोलीस डिजिटल व्हॅनमध्येच होणार असल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी एस. स्वामी यांनी दिली आहे.