स्टेशन रोड परिसरात गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक
धुळे शहरातील स्टेशन रोड परिसरात गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह फिरत असलेल्या तरुणाला धुळे शहर पोलिसांनी अटक केली आहे. साहिल सुनील केदार वय २१, रा. नारायण मास्तर चाळ, चितोड रोड, धुळे असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक तरुण रेल्वे स्टेशन रोडवरील रेल्वे बोगद्याच्या दिशेने गावठी पिस्तूल घेऊन फिरत असून, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
याची खात्री होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत राठोड यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तत्काळ सापळा रचून साहिल केदार याला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळली. पोलिसांनी हे शस्त्र जप्त केले असून, त्याची एकूण किंमत अंदाजे २७,००० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. साहिल केदारविरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार करीत आहेत.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली