आक्षेपार्ह स्टेटस लावू नका, सोशल मीडिया संदर्भात पोलिसांचे आवाहन
सोशल मीडिया मधून व्यक्त होत असताना कोणीही दोन समाजात द्वेष पसरेल अशा पोष्ट, क्लिप्स किंवा मेसेज टाकू नयेत. तसे कोणी प्रयत्न केल्यास त्यांच्या विरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल, असा इशारा शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी दिला आहे. सामाजिक एकोपा टिकून राहावा यासाठी सहकार्य करावे असे आवाहनहि पाटील यांनी केले.
सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या औरंगजेब कबर प्रकरण व नागपूर दंगल प्रकरणी सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर अपलोड करीत दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५ युवकांना शनिवारी शेगांव पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. सायबर विभाग या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट, मजकूर प्रसारित करणाऱ्यांवर नजर ठेऊन असून त्यांच्या सूचनेनंतर पोलीस प्रशासन अशांना पकडून कारवाई करीत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे.
त्यासाठी चौकाचौकात जाऊन पोलीस नागरिकांना पोळीच व्हॅन मधून आवाहन करून माहिती देत आहे. त्यामुळे व्हाट्सअँप, इन्स्टाग्राम, फेसबुकसारखे सोशल मीडियावर चिथावणीखोर किंवा दोन समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट अपलोड किंवा फॉरवर्ड केल्यास आपणासही जेलची हवा खावी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मिडीयाचा वापर करतांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी केले आहे.