LOKSANDESH NEWS
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर उपोषण
खरीप हंगाम २०२४ आणि त्यापूर्वीच्या दोन खरीप हंगामातील पीक विम्याची रक्कम अद्याप युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने दिली नाही. त्यामुळे २४ मार्चपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद पाटील हडसणीकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा यासाठी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या पिकविम्याची रक्कम सरकार भरेल, शेतकऱ्यांनी फक्त एक रुपया भरायचा आहे,
अशी घोषणा करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पिक विमा काढण्यासाठी प्रेरित केले. परंतु याचा कुठलाही लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. खरीप हंगामात पिकांची परिस्थिती बघून नुकसानी बद्दल अग्रीम २५ टक्के विमा परतावा रक्कम देण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आदेश काढले होते. परंतु २५ टक्के रक्कम एक महिन्याच्या आत देण्याची तरतूद असतांना, तब्बल चार ते सहा महिने उलटून गेले तरी पीक विमा नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी
आपल्या नुकसानीचे दावे दाखल केल्यानंतर उर्वरित रक्कम कंपनीने देणे बंधनकारक होते. परंतु अद्याप रक्कम देण्यात आलेली नाही. पीक विमा कंपनी, कृषी विभाग, महसूल प्रशासनाकडे तालुक्यासह परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. प्रशासनाने काढलेली खरीप हंगामातील पिकांची टक्केवारी जिल्ह्याची ४७ टक्के तर हदगाव तालुक्याची ४८.५९ आली होती. कापणी प्रयोगातून देखील सरासरी उत्पादनात घट आली असल्याचे समोर आले. पीक विमा कंपनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने मागील दोनही वर्षाचा पीक विमा नुकसान भरपाई रक्कम अद्याप दिली नाही.
त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी दि. २४ मार्च पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. प्रल्हाद पाटील हडसणीकर यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव वानखेडे, पंजाबराव देशमुख संदीप सुर्यवंशी, गणेशराव सुर्यवंशी, देवानंद वाघमारे गोजेगांवकर, लक्ष्मणराव शिंदे नेवरीकर, सुनील पाटील सुर्यवंशी हरडफकर, भास्करराव सुर्यवंशी, लक्ष्मणराव शिंदे धानोरा, सरपंच रवी गोरे, ज्ञानेश्वर हेंद्रे यांची उपस्थिती होती.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली