चाऱ्याचे भाव वाढल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांवर जनावरे विकण्याची आली वेळ,चार छावण्या उभारण्याची शेतकऱ्यांची मागणी
शेती व्यवसायाला जोडधंदा बहुसंख्य शेतकरी दूध उत्पादक जनावरांचे पालन पोषण करत असतात मात्र, दुधाला मिळणारा कमी भाव आणि त्यातच ऐन उन्हाळ्यात चाऱ्याचे भाव प्रचंड वाढल्याने धुळे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.
शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून शेतकरी दूध उत्पादनाचा देखील व्यवसाय करीत असतात मात्र चाऱ्याचे वाढते भाव आणि त्यातच दूधला मिळणारा अत्यल्प भाव लक्षात घेता दूध उत्पादक जनावरे जगवायची तरी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. उन्हाळ्यात चाराटंचाईमुळे पशुपालक शेतकऱ्यांना जनावरांचा सांभाळ करणे अवघड होते. दुभत्या जनावरांसाठी दुप्पट पैसे मोजून चारा खरेदी करावा लागत आहे. यात महिन्याला एका जनावरासाठी अडीचे ते तीन हजार रुपये चाऱ्यासाठी खर्च येत आहे, तर दुधाच्या उत्पादनातून खर्च वजा जाता कसेबसे दोन हजार रूपये मिळत असल्याचे पशुपालकांनी सांगितले आहे.
एकंदरीत दुग्धोत्पादन व्यवसायात 60 ते 65 टक्के खर्च हा जानावरांच्या चाऱ्यावर होत असतो. यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे चाऱ्याची उपलब्धता असली, तरी मागणी जास्त असल्यामुळे चाऱ्याचे दर वाढले आहेत. त्यात पाळीव जनावरांना हिरवा चाराही गरजेचा असल्यामुळे, त्याचे दर जास्त वाढले असून, शेतकऱ्यांना चाऱ्यावरच सध्या जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे चाऱ्याचा खर्च जास्त होत असून त्याप्रमाणात दुध विक्रीतून येणारे उत्पन्न कमी झाल्याने हा व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना चारा टंचाई सारख्या समस्यांना सामोरे जावे लागत असताना शासनाने चारा छावण्या सुरू करण्याची मागणी देखील आता शेतकऱ्यांमधून होत आहे..