लोकसंदेश न्यूज नेटवर्क
अष्टपैलू धनंजय पाठक
नामवंत पत्रकार, गुणी अभिनेता, उत्तम वक्ता आणि मदतीला धावून जाणारा मित्र अशी धनंजय गोविंद पाठक याची ओळख सांगता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे धनंजयने त्याच्यामधील चांगुलपणा कायमस्वरूपी टिकवून ठेवला आहे. किंबहुना तो त्याचा स्वभावच आहे. घराण्याचा आध्यात्मिक वारसा त्याला ओतप्रोत लाभला आहे. आणि त्याबद्दल तो अत्यंत कृतज्ञ आहे.
धनंजयचा आणि माझा पहिला परिचय विलिंगडन महाविद्यालयात झाला. तो परिचय होऊनसुद्धा आता ४५ वर्षे झाली. मात्र जवळजवळ चार तपे आमचा स्नेह कायमच राहिला आहे. एवढेच नव्हे;तर तो दिवसेंदिवस वाढतोच आहे. याचे कारण धनंजय गोविंद पाठक याचा सुस्वाभाव.
कॉलेजमध्ये असल्यापासून धनंजय हा अत्यंत प्रामाणिक. कुणाचीही केवळ तोंडावर भलावण करणारा नव्हे. परखडपणे बोलणारा; परंतु जिव्हाळा कायम टिकवून ठेवणारा. त्यामुळेच मिरज आणि सांगली जिल्हा त्याला एक उत्तम मित्र संग्राहक पत्रकार म्हणूनच ओळखतात. मिरज ही ऐतिहासिक नगरी. संगीताची गंधर्वनगरी, विद्येची सरस्वतीनगरी. राजकारण, खेळ, नाटक, साहित्य, कला आणि अध्यात्म यांची मिरजेला प्रदीर्घ अशी परंपरा आहे. अशा या संस्कृती संपन्न मिरजेचा धनंजयला विलक्षण अभिमान आहे. आणि तो सार्थही आहे. अलीकडे आपल्या घरी गावाबद्दलचा, परिसराबद्दलचा जिव्हाळा कमी होत चालला आहे. परंतु धनंजय गोविंद पाठक यांच्यासह अनेकांनी तो कसोशीने जपला आहे. 'अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी' तसा तो जिव्हाळा त्यांच्या अंतकरणातच आहे.
धनंजय हा सायन्सचा आणि मी आर्ट्सचा विद्यार्थी. त्यामुळे खरे म्हणजे आमचा फारसा परिचय होणे तसे कठीण होते. परंतु रंगभूमी या घटकामुळे आमच्यातील सायन्स आणि आर्ट अशा सीमारेषा केव्हा पुसल्या गेल्या ते कळलेच नाही. प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक तसेच मराठीचे नामवंत प्राध्यापक दिलीप परदेशी यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली विलिंग्डन महाविद्यालयातील आमचे दिवस खऱ्या अर्थाने बहरले होते. आम्ही सगळे सर्वसामान्य घरातून आलेले विद्यार्थी. त्यामुळे कॉलेज लाईफ एन्जॉय करणे हा खर्चिक विचार आमच्या मनात कधी आला नाही. येणे शक्यही नव्हते.परंतु प्रा. परदेशी यांच्या मार्गदर्शनाने आम्ही त्यावेळी अभिरुची मंडळ स्थापन केले. त्या मंडळाच्या माध्यमातून एकांकिका, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा अशा विविध प्रकारच्या सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल अनुभवली. त्या अर्थाने आम्ही कॉलेज लाईफ एन्जॉय केले.
विलिंग्डन महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य भास्कर (बापू) ताम्हणकर, संजय भिडे , मी, धनंजय पाठक, मिलिंद लिमये, महेंद्र कुलकर्णी, शहाबुद्दीन जमादार, स्मिता वनपाल ,शर्मिला आपटे, वंदना डुबल,स्मिता देशपांडे अशा आमच्या ग्रुपने शिवाजी विद्यापीठाच्या युवक महोत्सवात तसेच भावे नाट्य मंदिरातील एकांकिका महोत्सवात एकांकिका सादर केल्या. ती मजा काही वेगळीच होती. अनेक वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेमध्ये मी त्यावेळी भाग घेतला. प्रा. परदेशीसर माझे मार्गदर्शक होते. त्याचबरोबर मला त्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्यांमध्ये धनंजय आणि इतर सर्व मित्रमंडळी यांचा पुढाकार होता.
धनंजयमधील अभिनयाचे गुण त्याचवेळी सर्वांच्या लक्षात आले होते. पुढे आम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करू लागलो. माझ्याबरोबरच धनंजय दैनिक सकाळमध्ये वार्ताहर म्हणून काम करू लागला. पत्रकारितेमध्ये काम करत असतानाच त्याने आपला अभिनयाचा गुण आणि पैलूही चांगला जपून ठेवला. अनेक नाटकांमध्ये तसेच चित्रपट आणि मालिकांमध्येसुद्धा त्याने अनेक विविध भूमिका साकारल्या. अभिनयाच्या क्षेत्रात वाहवा मिळवली. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे संयोजन, नियोजन आणि सूत्रसंचालन यामध्येही त्याचा आजही मोठा पुढाकार असतो. पत्रकार म्हणून काम करतानाही त्याने मिरज आणि मिरज तालुक्याचे तसेच सांगली आणि सांगली जिल्ह्याचे अनेक प्रश्न वृत्तपत्रात मांडले. सर्वसामान्य लोकांच्या जिव्हाळ्याच्या विषयांना त्याने पत्रकारितेत नेहमीच प्राधान्य दिले. मिरजेतील दैनिक बंधुता चा कार्यकारी संपादक म्हणूनही तो उत्तम काम करीत आहे. त्याचबरोबर स्वतःचे वेब पोर्टलही त्याने अतिशय चिकाटीने चालवले आहे.
आजोबा आणि वडील यांच्याकडून धनंजयला अध्यात्माचा आणि परमेश्वरावरील श्रद्धेचा मोठा वारसा लाभलेला आहे. कदाचित त्यामुळेच अनेक अडचणी आणि संकटे यावर तो हसतमुखाने मात करू शकला असावा. खूप प्रतिकूल परिस्थितीत त्याने आपल्या आयुष्याला आकार दिला आहे. त्यामध्ये त्याचे दोन्ही चिरंजीव तसेच पत्नी यांचाही मोठा सहभाग आहे.
चिंतामणी सहस्रबुद्धे...
अशा या सच्चा मित्रास.. संपादक :लोकसंदेश न्यूज मीडिया सलीमभाई नदाफ यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.....
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.