घरगुती नळ जोडणीची कामे मार्च अखेर पूर्ण करा
- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची बैठक संपन्न
सांगली, दि. 22 : जल जीवन मिशन योजनेंतर्गत घरगुती नळ जोडणीची कामे मार्च 2025 अखेर पूर्ण करावीत. ही कामे करताना ती दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात आयोजित जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी तृप्ती धोडमिसे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय येवले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता आमित आडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, ज्या योजनांची कामे 100 टक्के पूर्ण झाली आहेत, अशा योजना ग्रामपंचायतींकडे देखभाल दुरूस्तीकरीता त्वरीत हस्तांतरीत कराव्यात. याबाबत तालुक्यातील उप अभियंता यांनी पाठपुरावा करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
जल जीवन मिशन अंतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये एकुण 4 लाख 59 हजार 48 इतकी कुटुंब संख्या असून त्यापैकी 4 लाख 1 हजार 270 कुटुंबांना घरगुती नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे. उर्वरीत 57 हजार 778 इतक्या कुटुंबांना मार्च 2025 अखेर जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत 55 लिटर्स् प्रती दिन प्रती माणसी या दराने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत एकूण 675 कामे प्रस्तावित असून यापैकी 342 कामे पूर्ण झाली आहेत तर 333 कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
बैठकीत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, योजनेच्या जागेसंदर्भात अडीअडचणी, घरगुती नळ जोडणी आदींबाबतचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.