सुवर्णतुला
सुवर्णतुला दिनांक : १९ जानेवारी,१९४७
आजचे शीर्षक वाचून काहीतरी वेगळ वाचायला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना असेल.दोनच आठवड्यापूर्वी धनी वेलणकरांच्या जन्मदिनी लिहिले होते. आज वाचूया त्यांच्या दातृत्वाचा कळसाध्याय. निमित्त आहे त्यांनी केलेल्या सुवर्णतुलेचे .
सुवर्णतुलेचा वृतांत
सांगलीत आज काहीतरी अद्भुत घडणार याची ग्वाही देत १९ जानेवारी,१९४७ हा दिवस उजाडला. इतिहासात झालेल्या राजमाता जिजाऊसाहेब आणि सोनपंत डबीर यांच्या सुवर्णतुलेविषयी ऐकलेल्या सांगलीकर नागरिकांना आज प्रत्यक्षात सुवर्णतुला कशी केली जाते ते अनुभवता येणार होते.
श्री गजानन मिलच्या आवारात आठ हजार लोकांना बसून बघता येईल एवढं मोठा मंडप घातला होता.त्याला लता पल्लवांनी छानश्या कापडाने आणि विद्युत रोषणाई करून सजवले होते.
सगळ्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद सांगलीच्या राजेसाहेबांकडे होते. मिरजचे राजेसाहेब,बुधगावचे राजेसाहेब,औंधचे राजेसाहेब आणि त्यांचा राजपरिवार देखील उपस्थित होता. खूप मोठी थोर मंडळी जातीने उपस्थित होती. मंत्रघोषात समारंभ सुरु झाला आणि सर्व उपस्थित लोक तो डोळ्यात साठवून ठेवत होते.
दादासाहेब एका पारड्यात विराजमान झाले आणि दुसऱ्या पारड्यात प्रत्यक्ष राजेसाहेब स्वतःच्या हातांनी सोन्याच्या विटा ठेऊ लागले आणि एका क्षणी सोन्याचे पारडे जड झाले. दादासाहेब पारड्यातून खाली उतरले. ज्यांच्या सक्रिय पाठिंब्यामुळे हा सोन्याचा दिवस अक्षरशः उजाडला, त्या सांगलीच्या राजेसाहेबांना प्रथम वंदन करण्यासाठी ते चालू लागले, तेव्हड्यात नवल घडले, राजेसाहेब दोन पावले पुढे आले आणि त्यांनी दादासाहेबांना घट्ट मिठी मारली. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर आले. राजसाहेबांनी अश्या प्रकारे कधीही कोणाला मिठी मारली नव्हती.
आपल्या प्रजाजनांपैकी उद्योगात अत्यंत यशस्वी झालेल्या एका प्रजाजनाने सुवर्णतुला केली याचे त्यांना भूषण वाटत होते.
दादासाहेबांना तोललेल्या सोन्याचे वजन १२८ पौंड म्हणजे ५१२० तोळे भरले. त्या दिवशीच्या बाजारभावाने त्याची किंमत रु.५,३७,६०० इतकी झाली. त्या पैकी रुपये दोन लाखांचे वितरण विविध संस्था आणि व्यक्तींना केले व शिल्लक तिन लाखाचे वेगवेगळे ५ ट्रस्ट केले.
महर्षी कर्वे,महामहोपाध्याय काणे,महामहोपाध्याय पोतदार, देशभक्त नारायण दामोदर सावरकर,कर्मवीर भाऊराव पाटील,कृष्णराव कब्बूर,श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी,या सर्वानी दादासाहेबांचे कौतुक करणारी भाषणे केली.
या नंतर दादासाहेबांनी लिहिलेल्या जगात वागावे कसे या पुस्तकाचे प्रकाशन झाले.या पुस्तकाच्या आत्तापर्यंत २९ आवृत्या निघाल्या आहेत.
समर्थ रामदासांच्या दासबोधातील शब्दात राजेसाहेबांनी दादासाहेबांचे कौतुक केले.ते म्हणाले,
जेही उदंड कष्ट केले l
ते भाग्य भोगून ठेले l
येरे ते बोलतची राहिलेl
करंटे जन लाल
सुवर्णतुलेनंतर दादासाहेबांचे गावोगावी सत्कार झाले. सामाजिक समता रोजच्या जीवनात प्रत्यक्ष आचरणात आणणाऱ्या दादासाहेबांच्या मुंबईतील सत्काराचे अध्यक्षपद खुद्द डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आनंदाने स्विकारले होते.
या सर्व ट्रस्ट मध्ये दादासाहबांचे सुपुत्र रामसाहेबांनी कायम भर घातली. या ट्रस्ट मधून आत्तापर्यंत १ कोटी ७ लाखांच्या देणग्या दिल्या आहेत.आजमितीला दरवर्षी देणग्या देऊन या ट्रस्ट मध्ये रु.एक कोटी पाच लाख शिल्लक आहेत. दरवर्षी साधारणपणे दहा लाख रुपयाच्या देणग्या दिल्या जातात आणि अविरतपणे हे कार्य सुरु आहे.
कृतार्थ जीवन जगल्यावर मृत्यूला सामोरें कसे जावे ,याचा एक महान वस्तुपाठ त्यांनी आपल्यासमोर ठेवला आहे.अशा वेळीं समर्थ रामदासांच्या मनाच्या श्लोकातील खालील श्लोक आठवतो.
जिवा कर्मयोगे जनी जन्म जाला।
परी शेवटीं काळमूखी निमाला॥
महाथोर ते मृत्युपंथेचि गेले।
कितीएक ते जन्मले आणि मेले ॥
मरणे आणि ‘मृत्युपंथाने जाणे यांतील भेद, जो समर्थ रामदासांनी संगितला आहे, तो दादासाहेबांच्या कृतीतून एक आदर्श म्हणून नेहमीच आपल्यापुढे असेल.
जगाच्या नकाशात सांगलीची आगळी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या उद्योगपती दादासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करताना प्रत्येक सांगलीकराची मान ताठ होईल.
सौजन्य;
प्रसाद जोग.सांगली.
९४२२०४११५०
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.