लोकसंदेश न्यूज नेटवर्क
जगी वंद्य ते सर्वभावे करावे ...जगी...निंद्य ते सर्व सोडोनी द्यावे'..!
बारा वर्षे खासदार, चार वर्षे आमदार, राज्य सहकारी बँकेचे वर्षानुवर्षे संचालक, जिल्हा बँकेचे अनेक वर्षे संचालक अशी सार्वजनिक वाटचाल असणाऱ्या माणसाच्या घरात लक्ष्मी पाणी भरत असणार हा समज झाला तर त्यात वावगं काहीच नाही. परंतु माझे तीर्थरूप आबा या समजाला अपवाद होते..
त्यांच्या अंतीम समयीसुध्दा त्यांच्या नावावर अगदीच नाममात्र बँक बॅलन्स होता. राहण्यासाठी घर आणि बेनाडीत असलेली वडिलोपार्जित जमीन एवढीच त्यांची स्थावर मालमत्ता. घरच्यांसाठी, आम्हा भावंडांसाठी, बहिणीसाठी, पत्नीसाठी कांहीतरी करुन ठेवावं, अशी हिशोबी कृती त्यांची नव्हतीच. तो त्यांचा पिंडही नव्हता. त्यांचं ते निरपेक्ष, निरलस, साधं वागणं पाहून मला माझे आबा महात्मा गांधीजींचे सच्चे अनुयायी वाटतात. एका सर्वसामान्य माणसासारखे त्यांचे आर्थिक व्यवहार असत. शिलाईचा दर विचारुनच खादीचा कोट शिवायला टाकत आणि उसवलेला शर्ट स्वतःच्या हाताने सुई-दोऱ्याने शिवत. हे त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाहिलं आहे. राजकारणातलं त्यांचं हे वेगळेपण आमच्यासाठी, पूर्ण बेनाडीकर पाटील घराण्यासाठी परमोच्च अभिमानाचा विषय आहे.
स्वतःसाठी आपली, आपल्या नावाची एखादी संस्था असावी, एक आर्थिक आधार असावा, एखादी शिक्षण संस्था तरी असावी, असा विचारही त्यांना कधी शिवला नाही. त्यांच्या नावानं कांही संस्था उभ्या कराव्यात, संस्था काढाव्यात, असा त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रस्ताव मांडला, रेटा लावला की, ते कार्यकर्त्यांना प्रारंभीच धुडकावून लावत.
तळ्यात राहून पाणी प्यायचं नाही. वैभवात राहून स्वतःसाठी कांही भोगायचं नाही. सत्तेत राहून वैयक्तिक हित कधी साधायचं नाही. करायचं ते इतरांसाठी. पदाचा वापर जनतेसाठी करणारा, सत्ता, खुर्ची व पद यांचा किंचीतही हव्यास नसलेला, लाल दिव्याच्या गाडीपेक्षा जनतेच्या एसटीचा प्रवास मला परवडतो, मानवतो,'असं परखडपणे सांगणारा हा नेता होता.
--सहकार तीर्थ या ग्रथांतील पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या मनोगतातून साभार...
संकलन :प्रा. एन.डी.बिरनाळे
कार्यकारी अध्यक्ष
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (शिक्षक सेल)
दि.३ नोव्हेंबर, २०२४
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.