लोकसंदेश न्यूज नेटवर्क
भाऊचं काही खरं नाही !!!
एकास एक उमेदवार देऊन महिविकास आघाडीने मिरज विधानसभा मतदारसंघात भाजपचे सुरेश खाडे यांना मोठाच झटका दिल्यानंतर आता कॉंग्रेसला हात देत शरद पवार गटाने मशाल हाती घेतल्याने सुरेश खाडे यांचे ' विशाल ' विजय मिळविण्याचे स्वप्नभंग होत आहे .
मिरज विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा घोळ शेवटी तानाजी सातपुते यांच्या उमेदवारीने निवळल्यानंतर भाजप एकतर्फी निवडणूक होणार अशी हवा करत होते पण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने आणि कॉंग्रेसने शिवसेनेची निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने भाजपपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे .
मिरज विधानसभा मतदारसंघातील निवडणूक स्टॅंड करण्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळाल्यानंतर आता मिरज ग्रामीण भागातील मालगांव ,आरग,बेडग, म्हैसाळ या मोठ्या लोकसंख्येच्या गांवात परिवर्तनाची लाट निर्माण होऊ लागली आहे .
मिरज विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बंडखोरी व्हावी या दृष्टीने भाजपने रणणिती आखली होती पण त्याला एकास एक उमेदवार दिल्याने १५ वर्षात पहिल्यांदाच भाजपला आणि उमेदवार सुरेश खाडे यांना मोठा धक्का बसला आहे .
मिरज शहरातील बहुतांश आजी माजी नगरसेवकांनी आपलं वजन ठाकरे गटाचे तानाजी सातपुते यांच्या पारड्यात टाकल्याने आमदारकीचा सलग चौथा विजय मिळविण्याच्या भाजपचे सुरेश खाडे यांच्या स्वप्नांचा चोथा होताना दिसतोय .
महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्या भावाने आणि मिरज ग्रामीण भागातील गावांनी ही आमदारकीची निवडणूक स्वतः च्या हातात घेतल्याचं दिसतंय . महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा ग्रामीण भागात मनोज शिंदे ( म्हैसाळकर) , कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे ,बेडगचे माजी पंचायत समिती सभापती दिलीप बुरसे , सोनीचे जिल्हा मार्केट कमिटीचे माजी अध्यक्ष दिनकर पाटील , मालगावचे माजी सरपंच पप्पू सावंत यांनी खांद्यावर घेतली आहे .
कवलापूर (ता. मिरज) येथे भाजपचे भानुदास पाटील गटाचे वर्चस्व आहे तिथं माजी मंत्री जयंत पाटील यांची भुमिका महत्वाची ठरणार आहे . भाजपचे उमेदवार सुरेश खाडे यांनी मराठा आरक्षणाला मागणी करुनही पाठींबा दिला नसल्याने मिरज विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान असणारा मराठा समाज भाजपविरोधात कमालीचा प्रक्षुब्ध झाला आहे .
आरग ( ता. मिरज) येथे मराठा समाजाचा महामेळावा घेऊन महाविकास आघाडीचे तानाजी सातपुते यांना समर्थन देण्याची तयारी सुरू असल्याचे ऐकायला मिळाले तर सोशल मिडियात मराठा समाजाच्या गृपवरुन भाजप आणि उमेदवार सुरेश खाडे यांच्या विरोधात रान तापवले जात आहे .
तानाजी सातपुते यांचे बंधू आणि कॉंग्रेसचे माजी नगरसेवक बसवेश्वर सातपुते हे महाविकास आघाडीच्या प्रचाराची सुत्रं हालवत असल्याने तानाजी सातपुते यांची उमेदवारी म्हणजे कॉंग्रेसची उमेदवारी मानली जात आहे . बसवेश्वर सातपुते यांचे भाजपमधील दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या बरोबर अतिशय घनिष्ठ संबंध असल्याची चर्चा आहे . त्याचबरोबर मिरज पॅटर्नही बसवेश्वर सातपुते यांच्या नेहमीच्या बैठकीतला असल्याचं मानलं जातंय .
बेडग येथील मिरज पंचायत समतीचे माजी उपसभापती संभाजी ( आबा) पाटील हे मराठा आरक्षणाचे कडवे समर्थक म्हणून ओळखले जातात . त्यांची भुमिका या आमदारकीच्या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे . करोली (एम),पायाप्पाचीवाडी , तानंग,बेडग,आरग, डोंगरवाडी,बेळंकी ,संतोषवाडी ,सलगरे, शिपुर,मल्लेवाडी या मराठा बहुल गावांची भुमिका या आमदारकीच्या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे .
भाजपचे योगी आदित्यनाथ यांनी ' बटेंगे तो कटेंगे ' चा दिलेला नारा सुरेश खाडे यांना पराभवाकडे घेऊन जाताना दिसतोय . योगी आदित्यनाथ यांच्या या ना-याने मिरजेतील मुस्लिम ,ख्रिस्ती समाज भाजपविरोधात प्रथमच जोरदारपणे एकवटलाय .
सोनी ( ता. मिरज) येथील भाजपच्या जाहीर सभेत अपक्ष १३ उमेदवारांच्या विरोधात आपत्तीजनक टिप्पणी झाल्याने हे प्रकरण एम आय एमचे उमेदवार महेशकुमार कांबळे यांनी पोलिस ठाण्यापर्यंत नेलंय .त्याचाही भाजपला मोठा दणका बसण्याची शक्यता आहे .
खासदार विशाल पाटील आणि माजी मंत्री जयंत पाटील यांचे समर्थक पहिल्यांदाच संघटीत होऊन एकत्रितपणे भाजपचे उमेदवार सुरेश खाडे यांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिलेत .हा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमधील फुटीरांच्या जिवावर १५ वर्षे विजय मिळवविणा-या सुरेश खाडे यांच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे . भाजपचे पुर्वश्रमीचे मोहन व्हनखंडे यांनी तर सुरेश खाडे यांच्या पराभवासाठी प्रचाराची मोहिमच उघडल्या .
सुतारकाम, लोहारकाम,गवंडीकाम,प्लबिंगकाम करणा-या ८० टक्के ख-या कामगारांना कामगार योजनांचा फायदा मिळाला नसल्याने या श्रमकरी वर्गात भाजपचे सुरेश खाडे यांच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे .
मावलणमधील भाजपने उभारलेला पुतळा अल्पावधीतच कोसळल्याने मतदारसंघातील शिवप्रेमी भाजप विरोधात मोठा असंतोष व्यक्त करताना दिसताहेत .
आमदार सदाभाऊ खोत यांनी खासदार शरद पवार यांच्या शारीरिक व्यंगावरती खालच्या पातळीवरची टिका केल्याने त्याचेही तिव्र पडसाद मिरज विधानसभा मतदारसंघात उमटत आहेत .
एरंडोली, मल्लेवाडी, खंडेराजुरी येथील पिण्याच्या पाणीपुरवठ्याच्या योजना पूर्ण करण्यात कामगारमंत्री असुनही सुरेश खाडे यांना अपयश आल्याने त्याचाही निवडणुकीत भाजपला फटका बसणार आहे .
महाविकास आघाडीने तानाजी सातपुते यांच्या रूपाने तरुण चेहरा दिलाय .याच्या उलट भाजपने सुशांत खाडे यांच्या ऐवजी वार्धक्यात असलेल्या सुरेश खाडे यांना उमेदवारी दिल्याने त्याचीही अडवाणी पॅटर्न राबविणा-या भाजपला किंमत मोजावी लागत आहे .
एकंदरीत सुरेश खाडे यांच्यासाठी आमदारकीची ही चौथी निवडणूक अत्यंत खडतर ठरत आहे !!!
लेखक:
---- बाळासाहेब ल.पाटील
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.