लोकसंदेश न्यूज नेटवर्क
जयश्रीवहिनी पाटील यांना पाठिंब्यासाठी प्रतीक पाटील यांनी घेतली जरांगे - पाटील यांची भेट
राजकीय वर्तुळात चर्चा
ज्येष्ठ नेते वसंतरावदादा पाटील यांनी मराठा समाजासाठी फार मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या वारसांनीही समाजासाठी काम केले आहे, त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाने सांगली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार जयश्रीताई पाटील यांना पाठिंबा द्यावा यासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील तसेच माजी मंत्री मदन भाऊ पाटील यांच्या कन्या सोनिया होळकर यांनी आज आंतरवाली सराटी येथे मराठा क्रांती मोर्चाचे संस्थापक श्री. मनोज जरांगे - पाटील यांची भेट घेतली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हेही उपस्थित होते. या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात तसेच समाजकारणात वसंतदादा पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांनी सर्व समाजासाठी काम केले आहे. त्यांच्या घरातील व्यक्तिंनीही पुढे हाच कामाचा वारसा चालवला आहे. असे असतानाही उमेदवारी देताना लोकसभेच्यावेळी विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाला. त्यांनी त्या विरोधात बंड करून स्वतंत्र निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. सांगलीच्या जनतेने त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले असे प्रतीक पाटील यांनी श्री. जरांगे पाटील यांना सांगितले.
सांगली विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीतही मागच्यावेळी जयश्रीताई पाटील यांचा उमेदवारीवर मजबूत दावा असताना त्यांना डावलण्यात आले. पुढच्यावेळी आपला विचार करू असं सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही सर्वांनी पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी काम केले. यावेळी जयश्रीवहिनींच्या उमेदवारीबाबत विचार होईल अशी खात्री होती. तरीसुद्धा त्यांचा विचार झाला नाही. दादा घराण्यावर अशाप्रकारे अन्याय होत असेल तर ते कार्यकर्ते सहन करत नाहीत, त्यामुळे या निवडणुकीत आम्ही अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतलेला आहे, असेही चर्चेत त्यांना सांगण्यात आले.
आपण मराठा समाज महाराष्ट्रात एक केला आहे. आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजातील लोकांच्या प्रश्नांसाठी झटत आहात. आम्हीही या कार्यक्रमाचा भाग आहोत तरी आपला आम्हाला या निवडणुकीसाठी पाठिंबा मिळावा ही अपेक्षा आहे, अशी विनंती करण्यात आली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.