मराठी चित्रपटांमधील व नाटकांमधील जेष्ठ अभिनेते अतुल_परचुरे यांचे आज (१४ ऑक्टोबर २०२४ रोजी) निधन झाले....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

मराठी चित्रपटांमधील व नाटकांमधील जेष्ठ अभिनेते अतुल_परचुरे यांचे आज (१४ ऑक्टोबर २०२४ रोजी) निधन झाले....



मराठी चित्रपटांमधील व नाटकांमधील
जेष्ठ अभिनेते अतुल_परचुरे यांचे आज (१४ ऑक्टोबर २०२४ रोजी) निधन झाले....

          अतुल परचुरे यांचा अल्पपरिचय.

जन्म.३० नोव्हेंबर १९६६
अतुल परचुरे हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते होते. बालकलाकार म्हणून अभिनयातील कारकीर्दीला सुरुवात केलेल्या परचुरेंनी अनेक मालिका व चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारुन चाहत्यांच्या मनात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं.
'तरुण तुर्क म्हातारे अर्क' नाटकातला '(मु)कुंदा' नावाचा थोडासा स्त्रियांसारखा वागणारा, बोलणारा मुलगा आणि 'नातीगोती' नाटकातला 'बच्चू' हा मतीमंद मुलगा ही दोन अत्यंत वेगळी पात्र, परस्पर भिन्न स्वरूपाची. भिन्न स्वभावांची पात्र. पण ती दोन्ही पात्र आपल्या सहज सुंदर अभिनयाने जिवंत करून रसिकांना एक वेगळीच अनुभूती देणारा विलक्षण ताकदीचा भन्नाट अभिनेते "अतुल परचुरे" यांनी पु. ल. देशपांडे यांच्या समोर त्यांचीच व्यक्तिरेखा त्याने 'व्यक्ती आणि वल्ली' या नाटकात अत्यंत उत्तम पद्धतीने साकारली. 'गेला माधव कुणीकडे', 'तुझे आहे तुजपाशी', 'भ्रमाचा भोपळा', 'बे दुणे पाच', 'प्रियतमा', 'वासूची सासू', 'डोळे मिटून उघड उघड', 'ए भाऊ डोकं नको खाऊ', 'वाह गुरू', 'आम्ही आणि आमचे बाप' अशा अनेक नाटकांमधे त्याने विविधरंगी भूमिका करून रसिकांच्या हृदयात हक्काचं आणि प्रेमाचं स्थान मिळवलं. 'नारबाची वाडी', 'हाय काय नाय काय', 'झकास', 'आम्ही सातपुते', 'नवरा माझा नवसाचा', 'पेइंग घोस्ट' अशा अनेक मराठी, तर, 'चोरोंकी बारात', 'जिंदगी 50-50', 'लव्ह रेसिपी', 'छोडो कल की बाते', 'खट्टा मिठा', 'ऑल द बेस्ट', 'डिटेक्टिव्ह नानी', 'ईट्स ब्रेकिंग न्यूज', 'पार्टनर', 'आवारापन', 'सलाम ए ईशक', 'कलयुग', 'यकीन', 'फिर भी दिल है हिंदुस्तानी', 'बेदर्दी', 'जुडवा 2' अशा अनेक हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाने चाहत्यांना तणावमुक्त करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं हसू उमटवलं आहे.
"बिल्लू" चित्रपटातला चित्रीकरणाचा अफलातून प्रसंग अतुल परचुरे यांचा कमाल अभिनय रसिकांच्या अजूनही स्मरणात आहे. "जागो मोहन प्यारे" आणि "भागो मोहन प्यारे" या मालिकांद्वारे आता अतुल परचुरे हे घराघरात पोहोचले. "कापूस कोंड्याची गोष्ट" या नाटकातील त्यांच्या अद्वितीय अभिनयाने रसिकांनी हे नाटक अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. 
खिचडी’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘क्योकी’, ‘पार्टनर’, ‘प्रियतमा’ यांसारख्या चित्रपट आणि मालिकांद्वारे गेली तीन दशकं ते सातत्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.लक्षवेधी बाब म्हणजे आजवरच्या करिअरमध्ये त्याने विनोदी भूमिका मोठ्या प्रमाणावर साकारल्या आहेत. परंतु ‘माझा होशिल ना’ या मालिकेत ते एका खलनायकाच्या भूमिकेत दिसले आहेत.
अतुल परचुरे कपील शर्मा शो मध्येही दिसले होते.
प्रख्यात नृत्यदिग्दर्शका सोनिया परचुरे या अतुल परचुरे यांच्या पत्नी होत. दोघांची ओळख नाटकात काम करताना झाली.
सोनिया परचुरे यांनी ‘शरयू नृत्य कलामंदिर’ या नावाची नृत्यकलेचे शिक्षण देणारी संस्था स्थापन केली आहे. शास्त्रीय नृत्याचे शिक्षण देणारे हे नामवंत ठिकाण असून तेथे कथ्थकमधील एकूण एक बारकावे शिकवले जातात. सध्या त्यांच्याकडे अगदी पाच वर्षीय बालकांपासून ते थोरामोठ्यापर्यंत असे तब्बल २०० विद्यार्थी नृत्याचे धडे घेत आहेत.सोनिया परचुरे यानी ‘नाट्य अभिनेत्री’ म्हणून ’सवाल अंधाराचा’, ’प्रेमाच्या गावा जावे’, ’गेला माधव कुणीकडे’, ‘तुझं आहे तुजपाशी’ आदी नाटकांत भूमिका साकारल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अतुल परचुरे  चित्रपटसृष्टी फारसे सक्रिय नव्हते.अतुल परचुरे गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्यावर उपचारदेखील सुरु होते. उपचारानंतर ते बरे देखील झाले होते. गंभीर आजारपणातून बरे झाले होते व अतुल परचुरे यांनी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा कमबॅक केलेलं पाहायला मिळालं होतं. झी नाट्य गौरव सोहळ्यादरम्यान अतुल यांची खास उपस्थिती असलेली पाहायला मिळाली. आजवर अतुल यांनी त्यांच्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली.  आजारपणाशी लढा देत अतुल यांनी सिनेसृष्टीतील त्यांचा प्रवास सुरु केला होता.
अतुल परचुरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई