लोकसंदेश न्यूज नेटवर्क
महापालिका कार्यक्षेत्रात दि-3 सप्टेंबर 2024 पासून क्षयरोगाविरुद्धच्या लढाईत प्रौढांना देणार बी.सी.जी. लस --- मा.आयुक्तसो तथा प्रशासक शुभम गुप्ता
क्षयरोगापासून बचाव होण्यासाठी बी.सी.जी. लस जन्मतः सर्व लहान मुलांना देण्यात येते. बी.सी.जी. लस ही सर्वांत सुरक्षित असून, त्यामुळे लहान मुलांचा गंभीर प्रकारच्या क्षयरोगापासून बचाव होतो. सद्यःस्थितीमध्ये बऱ्याच देशांत प्रौढांमध्ये होणाऱ्या क्षयरोग प्रतिबंधासाठी बी.सी.जी. लसींचा वापर होत आहे. त्या अनुषंगाने सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये आरोग्य विभागामार्फत प्रौढांना बीसीजी लस देण्यात येणार आहे.
भारतामध्ये यापूर्वीच गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये या लसीचा वापर प्रौढांमधील क्षयरोग प्रतिबंधासाठी करण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्ये काही ठरावीक ग्रामीण जिल्ह्यामध्ये व महापालिका क्षेत्रांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रौढांना बी.सी.जी. लस येत्या सप्टेंबर महिन्यापासून देण्यात येणार आहे. यासाठी प्रौढांमधील काही गट ज्यांना क्षयरोग होण्याची शक्यता जास्त आहे. त्यांना प्रथमतः ही लस देण्यात येणार आहे.
स्वतंत्र लसीकरण सत्रांचे आयोजन केले जाणार
■18 वर्षांवरील वर्गासाठी ही लस देण्यात येणार असून, बी.सी.जी. लस देण्यासाठी आशांमार्फत सां.मि.कु.मनपा कार्यक्षेत्रात घरोघर सर्वेक्षण करण्यात आले आहे. एकूण 60881 अपेक्षित लाभार्थ्यांची नोंद करण्यात आलेली असून, त्यामध्ये 16060 लाभार्थ्यांनी ही लस घेण्यासाठी संमती दिली आहे.
■ ही लस जे लाभार्थी संमती देतील त्यांनाच देण्यात येणार आहे. लस देण्याकरिता मनपा शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी स्वतंत्र लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या लसीकरणचा लाभ घ्यावा, असे आवाहन मा.आयुक्त तथा प्रशासक श्री.शुभम गुप्ता (भा.प्र.से) यांनी केले आहे.
(डॉ.मंजूषा दोरकर)
शहर क्षयरोग अधिकारी
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिका.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.