जुनी पेन्शन - शासकीय कर्मचारी आणि शिक्षक/शिक्षकेतरांच्या संपत्तीचा हक्क आहे.. ती शासनाची मेहरबानी नाही

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

जुनी पेन्शन - शासकीय कर्मचारी आणि शिक्षक/शिक्षकेतरांच्या संपत्तीचा हक्क आहे.. ती शासनाची मेहरबानी नाही



लोकसंदेश न्यूज नेटवर्क 

जुनी पेन्शन - शासकीय कर्मचारी आणि शिक्षक/शिक्षकेतरांच्या संपत्तीचा हक्क आहे.. ती शासनाची मेहरबानी नाही 

जो पुरानी पेन्शन बहाल करेगा वो ही महाराष्ट्रपर राज करेगा 

आक्रोश मोर्चात पृथ्वीराज पाटील यांनी शासनावर डागली तोफ 

सांगली दि.५:नवीन पेन्शन योजना माथी मारुन शासनाने राज्यातील शासकीय व शाळा महाविद्यालयांच्या कर्मचाऱ्यांची जगण्याची गँरटीच काढून घेतली आहे. जुनी पेन्शन योजना ही दीर्घकाळ शासनाची सेवा करुन पिढी घडवणाऱ्या शासकीय यंत्रणेतील कर्मचारी व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानाने जगण्याचा एकमेव आधार व हक्क आहे. पेन्शनच्या नवीन योजना फसव्या आहेत. जो पुरानी पेन्शन बहाल करेगा वो ही महाराष्ट्रपर राज करेगा अशी शासनावर घणाघाती तोफ पृथ्वीराज पाटील यांनी डागली. जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू केलीच पाहिजे ही मागणी लावून धरुन आज सांगलीत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना पुरस्कृत विविध शासकीय कर्मचारी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी कलेक्टर ऑफिसवर भव्य आक्रोश मोर्चा काढला त्यावेळी पृथ्वीराज पाटील कडाडले. 


स.११.३० वा क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विश्रामबाग चौकातून ढोल ताशांच्या गजरात आक्रोश मोर्चास प्रारंभ झाला. 

या मोर्चात "एकच मिशन- जुनी पेन्शन" अशा मजकुराच्या टोप्या परिधान करून हजारोंच्या संख्येने भर पावसात शासकीय  आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.महिला कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या आक्रोश मोर्चात 'एकच मिशन - जुनी पेन्शन, व्होट फाॅर ओपीएस, जो पुरानी पेन्शन बहाल करेगा वो ही विधानसभापर राज करेगा, जुनी पेन्शन आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. 


कलेक्टर ऑफिसवर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले स्वागत सागर खाडे तर प्रास्ताविक अमोल शिंदे यांनी केले. यावेळी पृथ्वीराज पुढे म्हणाले, "हा निर्धार मोर्चा आहे. महाआघाडीच्या वरिष्ठ नेत्याकडे मी आपलाच प्रतिनिधी आणि बंधू म्हणून जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी आवश्यक ती तजवीज करण्याचा आग्रह धरणार आहे.जुन्या पेन्शन योजनेस काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा पाठिंबा आहे. 
शासनाने जुनी पेन्शन योजना लागू होऊ नये यासाठी जाणीवपूर्वक कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे तो हाणून पाडण्यासाठी सर्व ४५ कर्मचारी संघटनांची एकीची मूठ अधिक घट्ट करा. १४ मार्च २०२३ रोजी माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत माझ्या व आ. अरुण लाड यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत निघालेला जुन्या पेन्शनचा भव्य मोर्चा आणि  कोल्हापूरचा भव्य मोर्चा यामुळे विधीमंडळात पेन्शन पिडितांचा आवाज घुमला म्हणून शासनाने दखल घेऊन जुन्या पेन्शनबाबत समिती नेमली खरी परंतु झाले कांहीच नाही. केंद्र व राज्य शासनाने आणलेली नवी पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांचा घामाचा पैसा शेअर बाजारात गुंतवून उद्योगपतींचे खिसे भरून कर्मचाऱ्यांचे आयुष्य उध्वस्त करणारी आहे."


-------------------------------------------------:------------------


" आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुले आहोत. फसव्या लाडक्या योजना नकोत.. शेतीमालाला हमीभाव द्या. सन्मानाने जगण्यासाठी जुनी पेन्शन योजना लागू करा.पृथ्वीराज पाटील आणि मी आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत. आम्ही दोघे आपल्या हक्कासाठी आपली कैफियत महाआघाडीच्या वरिष्ठ नेत्याकडे मांडून आपला जुन्या पेन्शनचा हक्क मिळवून देण्याकरिता संघर्षांसाठी कटिबद्ध आहोत. 
-----संजय विभूते - शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष 
-------------------------------------------------------------------
 
  सांगली जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी जुन्या पेन्शनच्या लढ्याचा आढावा घेऊन जुनी पेन्शन पूर्ववत लागू होईपर्यंत लढा अधिक तीव्र करण्याचा शासनाला इशारा दिला. 

यावेळी जिल्हा सचिव डॉ स्वप्नील मंडले, लिपिकवर्गीय संघटनेचे सागर बाबर, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे दत्तात्रय शिंदे, कास्ट्राईबचे गणेश मडावी, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, शिक्षक समितीचे अध्यक्ष माणिक पाटील व कार्यवाह नेताजी भोसले, डीसीपीएसचे बापू दाभाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक विभाग राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रा. एन.डी.बिरनाळे, माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी मनोगते व्यक्त केली.अरुण खरमाटे, अमोल माने, अविनाश गुरव, प्रमोद काकडे, अरविंद गावडे,बाळासाहेब कटारे, सचिन बिरणगे, मुस्ताक व फैजल पटेल, रमेश मगदूम, संजय गायकवाड, पी. डी. शिंदे, मिलन नागणे, संजय गायकवाड, सचिन पाटील, विजय कांबळे, प्रविण देसाई, विनायक जाधव अमेय जंगम, सुधाकर माने, रतन कुंभार, दिपक बनसोडे, तुकाराम सावंत, संतोष व यशवंत जाधव, अनिल मोरे, राजकुमार भोसले, अरविंद जैनापुरे, आकाश जाधव, शुभांगी पाटील, गुरबसू वाघोली, बापू दाभाडे, नितीन गळवे, अविनाश मोहिते, मंदार नलवडे, दौलत बोरडे, जयश्री कुंभार, अजित मोहिते उपस्थित होते. 


या आक्रोश मोर्चात खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटना, कास्ट्राईब, जिल्हा परिषद व महसूल खात्याच्या अधिकारी व कर्मचारी संघटना, शिक्षक भारती, शिक्षक परिषद, आरोग्य कर्मचारी संघटना, डीसीपीएस संघटना, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.