लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी रायगड
कर्जत वीज ग्राहक समिती करणार लाक्षणिक उपोषण
महावितरण सोबत झालेली चर्चा निष्फळ
कर्जत:भूषण प्रधान..
कर्जत तालुक्यातील नागरिक विद्युत पुरवठ्याबाबत असलेल्या समस्यांमुळे त्रस्त झाले आहेत. त्या समस्यांचे निराकरण होत नसल्यामुळे ते आक्रमकही झाले आहेत. "कर्जत तालुका वीज ग्राहक समिती" च्यावतीने महावितरण कार्यालयावर 20 जुलै रोजी मूक मोर्चा देण्यात आला होता. ३० जुलै रोजी महावितरणचे अधिकारी प्रकाश देवके यांच्या सोबत समितीच्या शिष्टमंडळा सोबत बैठक पार पडली. मात्र बैठकीत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा एकदा लाक्षणिक उपोषणाची हाक समितीने दिली आहे. तारीख ठिकाण काही दिवसातच जाहीर करणार आहेत.
कर्जत तालुक्यातून २० जून रोजी भव्य असा मुक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नेहमी चळवळींमध्ये सहभागी न होणाऱ्या नागरिकांनीही आवर्जून उपस्थिती दर्शवली होती.
समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेऊन महावितरण कार्यालयाने समस्यांवर तोडगा काढणे अपेक्षित होते. परंतु तसे न झाल्याने समितीने पुढील दिशा ठरवण्यासाठी 28 जुलै रोजी शनी मंदिर येथे बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकीबाबत माहिती मिळताच महावितरण कार्यालयाकडून समितीला 30 जुलै रोजी चर्चेसाठी बोलवण्यात आले.
आज 30 जुलै रोजी समितीचे शिष्टमंडळ आणि महावितरणाचे कार्यकारी अभियंता प्रकाश देवके यांच्यात चर्चा झाली. देवके यांच्या म्हणण्यानुसार कर्जत शहरातील रस्त्याच्या मधे असलेले मोजके पोल तसेच अन्य छोट्या कामांसाठी नगरपालिका प्रशासनाने महावितरणास कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. समितीने 20 जुलै रोजी दिलेल्या निवेदनातील समस्यांवर महावितरणकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे समितीने लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. लवकरच उपोषणाची वेळ, ठिकाण, दिवस समितीकडून जाहीर करण्यात येईल.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / रायगड.