लोकसंदेश कर्जत प्रतिनिधी; भूषण प्रधान
कळंब पोश्री नदीपुलाला भगदाड .....वाहतुकीस धोकादायक
कर्जत मुरबाड महामार्गावरील कळंब येथील पोश्री नदी पुलावर अतिवृष्टीमुळे भगदाड पडले असून पूल वाहतुकीस धोकादायक ठरू शकतो ,भगदाड पडलेल्या भागात बेरिकेट लावण्यात आली असून पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे.मात्र सततधार पावसाने तसेच अवजड वाहनाच्या भारामुळे पुलाचा एकभाग कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याची आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मागील आठवड्या भरापासून सततधार कोसळणाऱ्या पावसात तालुक्यातील अनेक रस्त्याची दुरावस्था झाली आहे,त्यातच ठाणे आणी रायगड जिल्ह्याला जोडणारा वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा समजल्या जाणाऱ्या कर्जत मुरबाड हायवे वरील कळंब येथील पोशीर नदीपुलावर कळंब कडील भागात मातीचा भराव खचल्याने पूल वाहतुकीस धोकादायक झाला आहे,
शनिवारी सायंकाळी एका वाहन धारकास रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्या असल्याचे दिसले तसेच पुलाच्या एका बाजूचा मातीचा भराव वाहून मोठा भगदाड पडला असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना या बाबत कळवले असता पोलिसांनी खचलेल्या भागाच्या दुतर्फा तात्पुरता स्वरूपात बॅरिकेट्स लावल्या असून पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे,
सुमारे 70 ते 80 वर्ष जुनं बांधकाम असलेल्या व दगडी पिलरवर उभारलेल्या पुलाची यापूर्वी अनेक वेळा डागडुजी करण्यात आली आहे मात्र जुनं बांधकाम असल्याने पूल जीर्ण होत चालले आहे ,पुलाच स्लॅब खालच्या भागात अनेक ठिकाणी निखळला असून गंजलेल्या लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत ,वृक्ष- वेळीच्या विळख्याने पुलाचे बांधकाम दिवसागणिक कमकुवत होत आहे,त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून यापुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे अशी मागणी ग्रामस्थ ,वाहनधारक करत आहे .
प्रतिक्रिया:-
कळंब पोशिर नदीपुलावर मोठे भगदाड पडल्याने येथे मोठा अपघात होऊ शकतो प्रशासनाने तातडीने पाहणी करून उपाययोजना कराव्यात
विनोद भोईर ( ग्रामस्थ वारे)
प्रतिक्रिया:-
कर्जत मुरबाड महामार्गावर असलेल्या पोशीर नदी पूल अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे,त्यात सततच्या पावसाने पुलाला मोठे भगदाड पडून पुलाच्या एक बाजूचा आतील भराव वाहून गेला आहे,पुलावरून वाहतूक अशीच सुरू राहिली तर अवजड वाहनाच्या भाराने पुलाचा कळंब कडील भाग पूर्ण कोसळून अपघात होऊ शकतो प्रशासनाने ताबडतोब यावर उपाययोजना करावी
दीपक म्हसे ( ग्रामस्थ खैरपाडा-कळंब)
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई /रायगड.