पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनच्यावतीने आज शिवराज्याभिषेक सोहळा..

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनच्यावतीने आज शिवराज्याभिषेक सोहळा..

पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनच्यावतीने आज शिवराज्याभिषेक सोहळा...

*शिवज्योतीची द्वितीय वर्षपूर्ती : विविध कार्यक्रमांचे आयोजन


सांगली : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक निमित्त पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनच्या वतीने आज ६ जून रोजी मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सायंकाळी सहा वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पुतळ्यासमोर उभारण्यात आलेल्या शिवज्योतीचे द्वितीय वर्ष पूर्तीही साजरी केली जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५१ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जाणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर रायगडावरील मेघडंबरीची प्रतिकृती उभारण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात दोन वर्षांपूर्वी कायमस्वरूपी ज्योत प्रज्वलित केली जावी, अशी संकल्पना वीरेंद्र पाटील यांनी मांडली होती. ती त्यांनी प्रत्यक्षातही आणली. शिवज्योत स्तंभसाठी पाच गडांवरील माती आणि पाच नद्यांचे पाणी आणले होते. सांगलीतील अखंड ज्योत प्रज्वलित करण्यासाठी रायगडावरून ती आणण्यात आली होती. गेली दोन वर्षे ही ज्योत अखंडपणे तेवत आहे. त्याची द्वितीय वर्षपूर्ती साजरी केली जाणार आहे.
फत्तेशिकस्त, पावनखिंड गाजलेल्या चित्रपटातील गायक अवधूत गांधी आळंदीकर आणि सहकाऱ्यांच्या गीतांचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमस्थळी महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्थाही करण्यात आली आहे. याशिवाय नयनरम्य विद्युत रोषणाई, लेझर शो, फटाक्यांची आतिषबाजी केली जाणार आहे. पृथ्वीराज पाटील फाउंडेशन, सर्व शिवप्रेमी यांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येत आहे तरी या सोहळ्याचे सर्वांनी साक्षीदार व्हावे, असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.