ओंकार पोतदार - सातारा जिल्हा प्रमुख
दरोड्याच्या तयारीतील तिघांच्या मुसक्या आवळल्या; सातारा शहर पोलिसांची कारवाई
सातारा शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या तिघा तरुणांना शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडले. संबंधितांकडून धारदार हत्यार, एअर पिस्टल, मोबाइल, चोरीची दुचाकी आदी मिळून सवा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर या टोळीकडून चार गुन्हे उघडकीस आले आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आँचल दलाल आणि पोलिस उपअधीक्षक राजीव नवले यांनी सातारा शहरातील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची सूचना शहर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांना केली होती. त्यानुसार दि. ३० मे रोजी रात्रीच्या वेळी शहर ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक शहरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी औद्योगिक वसाहत परिसरात लुटमार करून दरोडा टाकण्याच्या तयारीत काही जण असल्याचे पथकाला समजले. त्यानुसार पथकाने सापळा रचून शोध सुरू केला. तेव्हा औद्योगिक वसाहतीत एका कंपनीसमोरील मोकळ्या जागेत काही तरुण विना क्रमांकाच्या दुचाकीवर संशयितरीत्या दिसून आले. पोलिस येत असल्याचे पाहून ते पळून जाऊ लागले; पण पोलिसांनी पाठलाग करून पकडले, तर एक तरुण अंधारात झाडाझुडपातून पळून गेला. निखिल राजू बडेकर (वय १९, रा. अमरलक्ष्मी शेडगेवस्ती, सातारा), ऋषिकेश शशिकांत पवार (वय १९, रा. काळोशी-कोडोली, ता. सातारा) आणि योगेंद्र ओमपाल शर्मा (वय २०, रा. झेंडा चौक चंदननगर, सातारा) अशी त्यांची नावे असल्याचे समोर आले, तसेच एक विधिसंघर्ष बालकही यामध्ये दिसून आला. पोलिसांनी विचारणा केल्यावर संबंधितांनी औद्योगिक वसाहत परिसरात वाटसरूंना अडवून हत्याराची भीती दाखवून लुटमार करणार असल्याचे सांगितले. पोलिस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. चार गुन्हे उघडकीस... पोलिसांनी संशियतांकडे चौकशी केल्यावर शहर ठाण्यातील चार गुन्हे उघडकीस आले. साताऱ्यातील पोवई नाक्यावर तरुणास कोयत्याने मारहाण करणे, देगाव रस्ता येथे हत्याराने मारहाण तसेच दुचाकी चोरीचे दोन गुन्हे केल्याची कबुली संशयितांनी दिली.