लोकसंदेश न्यूज नेटवर्क
सांगली शहरामध्ये कॅफेच्या नावाखाली सुरू असणाऱ्या अवैध गोष्टींवर तातडीने कठोर कारवाई करा आमदार सुधीर गाडगीळ यांची मागणी ; जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन..
सांगली 20 मे 2024 :- कॅफेच्या नावाखाली शहरात सुरू असणारे गैरप्रकार रोखण्यासाठी यापूर्वीच लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सुधीर गाडगीळ यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समक्ष भेटून सांगलीतील गंभीर परिस्थिती ची माहिती दिली होती व त्यावर कडक कारवाई होण्यासाठी पत्र हि दिले होते. त्यांनीही विषयाचे गांभार्य ओळखून कडक कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र पुन्हा कॅफेच्या नावाखाली गैरप्रकार सुरू झाले आहेत.
महानगरपालिका आणि पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा पुन्हा होणारे हे गैरकृत्य निंदनीय आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणांचा निषेध करण्यासह या घटनांची सखोल चौकशी करुन बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली. याबाबत त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची भेट घेऊन शहरातील सर्व कॅफेंची तपासणी करण्याचीही मागणी केली. आमदार गाडगीळ यांनी निवेदनात म्हटले आहे, शहरातील गल्ली-बोळात कॅफेचे पेव फुटले आहे. याबाबत प्रशासनानाने कार्यवाही करण्याबाबत मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. नुकतेच शहरातील एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर तिला कॉफीमधून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा प्रकार घडला. शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात कॅफेचे पेव फुटले आहे. या कॅफेमध्ये गैरप्रकार चालत असल्याच्याि तक्रारी आल्यानंतर लगेचच आपण पोलिस यंत्रणेसह गृहमंत्र्यांना पत्रव्यवहार केला होता. कॅफेमध्ये लैंगिक उत्तेजना निर्माण करणारे औषध, नशा करण्याच्याा वस्तूही पुरवल्या जातात. याच्या आहारी अनेक तरुण - तरुणी जात आहेत. हा प्रकार अतिशय गंभीर असून कॅफेतील गैरप्रकारांना आळा बसेल, अशा प्रकारची कडक कारवाई करणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालय तसेच कॅफेच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, दामिनी व निर्भया पथकाने सक्रिय राहिल्यास अशा प्रकारांना पायबंद बसेल. संबंधित कॅफेंनी कायदेशीर सर्व परवानग्या घेतल्याची तपासणी करावी. जिथे गैरकृत्य व अनियमितता असेल त्या कॅफे चालकांवर गुन्हे नोंद करण्याची मागणीही आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.