लोकसंदेश न्यूज नेटवर्क
श्री संत बागडेबाबांचा १५ लाखाचा सागवानी रथ चिक्कलगी भुयारमध्ये दाखल..
चैत्रवारीला पायी दिंडीत सहभागी होणार रथ ; तुकाराम बाबा महाराज यांची माहिती...
जत:- महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले, राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचे परमशिष्य बागडेबाबा यांची पायी दिंडी दरवर्षी पंढरपूरला जाते. यावर्षीच्या श्री संत बागडेबाबा दिंडीत संपूर्ण सागवानी नक्षीकाम केलेला १५ लाखाचा रथ पायीदिंडीत सहभागी होणार असल्याने बागडेबाबांच्या भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पंढरपूर येथे तयार करण्यात आलेला हा रथ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पंढरपूरहुन चिक्कलगी भुयार मठात दाखल झाला आहे.
भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी या श्री संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीनुसार आपले संपूर्ण आयुष्य वैराग्यसंपन्न बागडेबाबा यांनी घालवले. अन्नदान, भजन, किर्तनाच्या माध्यमातून समाजातील चुकीच्या वाईट गोष्टीवर त्यांनी प्रहार करत समाजजागृती करण्याचे काम श्री संत बागडेबाबांनी केले. त्यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रासह कर्नाटकातही आहे. पांडुरंगाचे भक्त असलेले श्री संत बागडेबाबा यांनी चिक्कलगी भुयार मठातून चैत्रवारीला पायीदिंडी सुरू केली. या पायीदिंडीतही त्यांनी समाजजागृतीचे काम केले.
श्री संत बागडेबाबा यांनी सुरू केलेल्या चैत्रवारीच्या पायीदिंडीत भव्य रथही सहभागी व्हावा अशी बागडेबाबांच्या भक्तांची इच्छा होती. मागील सहा महिन्यांपूर्वी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हभप अमृत पाटील जाल्याळ यांनी गुढीपाडव्याला हा रथ तयार होवून भुयारमध्ये आला पाहिजे यासाठी नियोजन आखले. हभप अमृत पाटील जाल्याळ यांच्या या संकल्पनेला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बागडेबाबांच्या भक्तांनी दिलेल्या देणगीतून १५ लाखाचा भव्य रथ तयार करण्यात आला आहे. संपूर्ण सागवानी असलेला हा रथ अतिशय आकर्षक बनविण्यात आला आहे. रथावर घोडे, हत्ती अन्य कोरीव काम करण्यात आले आहे. पंढरपूर येथील भारत काळे यांनी हा रेखीव रथ तयार केला आहे.
गुढीपाडव्याला शुभदिनी आपण घरात वस्तू आणतो अगदी त्याचपद्धतीने पाडव्याला आपल्या गुरूंचा रथ आणण्याचा बागडेबाबांच्या भक्तांचा मानस होतो व तो मानस पूर्ण झाला. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रथ पंढरपूर येथून भुयार येथे आणण्यात आला. यावेळी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज, हभप अमृत पाटील जाल्याळ यांच्यासह नारायण चौगुले, दत्ता चौगुले , पिंटू कांबळे ,गुदळे सर , श्रीकांत पाटील, शिवराया हत्तळी, आप्पासो मलाबादी, प्रफुल्ल पटेल, सिद्धू उमराणी, श्रीशैल पुजारी, राजू चौगुले , प्रकाश तेली, आकाश घुले नंदू मेटकरी , बापू चौगुले, महेश भोसले, संतोष केळकर आदी बागडेबाबा भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.
■ बागडेबाबा भक्तांसाठी ऐतिहासिक क्षण
वैराग्यसंपन्न श्री संत बागडेबाबा यांनी आपली संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्ची केले. बाबांनी चैत्रवारीला पंढरपूरला पायी दिंडी सुरू केली. याच दिंडीमध्ये आता हा भव्यदिव्य,आकर्षक रथ सहभागी होणार असल्याने बागडेबाबांच्या भक्तांसाठी हा एक अनमोल ऐतिहासिक क्षण आहे. येत्या १६ एप्रिलला पायीदिंडी पंढरपूरला निघणार आहे. या दिंडीत भाविकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी यावेळी बोलताना केले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.