ओंकार पोतदार - वाई प्रतिनिधी
सातारा मध्ये यू. पी. पॅटर्न
शहरालगत असलेल्या प्रतापसिंह नगरातील गुंड दत्ता जाधव याच्यासह २२ सराईत गुन्हेगारांच्या घरावर बुधवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने बुलडोझर फिरविला. प्रतापसिंह नगरातील गुन्हेगारी कायमची मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे. शहरालगत असलेले प्रतापसिंहनगर गुन्हेगारी आणि गुंडगिरीसाठी ओळखले जाते. या प्रतापसिंहनगरातून सातत्याने गुन्हेगारी कारवाया होत असतात. याच नगरात राहणारा गुंड दत्ता जाधव याची दहशत प्रचंड होती. खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी, शासकीय कामात अडथळा असे गंभीर गुन्हे गुंड दत्ता जाधव याच्यावर दाखल आहेत. सध्या तो मोक्का कारवाईअंतर्गत कारागृहात आहे.
गेल्या आठवड्यात गुंड दत्ता जाधव याचा मुलगा अजय उर्फ लल्लन जाधव याने एका तरूणीच्या घरात घुसून तिच्यावर तलवारीने वार केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा प्रतापसिंहनगर चर्चेत आले.गुन्हेगारीच्या वरदहस्तामुळे तेथील गुंडांनी जागा बळकावून टोलेजंग इमारती बांधल्या होत्या. प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रारी होत्या. मात्र, आत्तापर्यंतठोस कारवाई केली जात नव्हती. प्रतापसिंह नगरातील वाढती गुन्हेगारी सर्वसामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे पुढे आल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी गुंडांच्या घरावर बुलडोझर फिरवण्याचा निर्णय घेतला.
तब्बल २२ गुन्हेगारांची यादी तयार करून प्रशासन बुधवारी सकाळी प्रतापसिंह नगरात बुलडोझर घेऊन पोहोचले. संबंधित २२ गुन्हेगारांची घरे शोधून त्यांच्या घरावर बुलडोझर फिरवण्यास सुरूवात केली. दुपारी बारापर्यंत ११ घरावर बुलडोझर फिरविण्यात आला. ही कारवाई दिवसभर सुरू राहणार आहे. २२ गुन्हेगारांची घरे भुईसपाट केली जाणार आहेत. या कारवाईसाठी जिल्हा पोलिस दलाने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.