मुंबई व महाराष्ट्रासाठी प्रगतीचा असणारा चिर्ले – कोन जोडरस्त्याच्या बांधकामाचा मार्ग मोकळा, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मुंबईतून ३०-३५ मिनिटांत गाठता येणार
मुंबई, शिवडीवरून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ३०-३५ मिनिटांत पोहचता यावे यासाठी हाती घेण्यात आलेल्या चिर्ले ते कोन जोडरस्त्याच्या कामाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शुक्रवारी झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कार्यकारी समितीच्या बैठकीत या कामाचे कंत्राट अंतिम करण्यात आले असून गावर कन्स्ट्रक्शन लिमिटेडला कंत्राट देण्यात आले आहे. महिन्याभरात या कामाला सुरुवात होणार आहे.
अटल सागरी सेतूने नवी मुंबईतील चिर्लेला आल्यास चिर्लेवरून पुढे पुण्याला राष्ट्रीय महामार्गावरून जावे लागते. हे अंतर बरेच मोठे आहे. त्यामुळे चिर्लेवरून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर थेट पोहचण्यासाठी अटल सागरी सेतू हा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला जोडण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेण्यात आला आहे. त्यानुसार चिर्ले ते कोन असा ६.५ किमीचा उन्नत जोडरस्ता बांधण्यात येणार आहे. यातील १.५ किमीचा रस्ता पूर्णत: नवीन असणार आहे.
दरम्यान या निविदेबाबत कार्यकारी समितीने काही अतिरिक्त माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार एक-दोन दिवसात ही माहिती कार्यकारी समितीला सादर करण्यात येईल. त्यानंतर कंत्राट अंतिम झाल्यावर शिक्कामोर्तब होईल. एकूणच आता कंत्राट अंतिम झाल्यात जमा असल्याने आता पुढील कार्यवाही करत महिन्याभरात उन्नत जोडरस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. तर कामास सुरुवात झाल्यापासून ३० महिन्यात अर्थात अडीच वर्षात काम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे अडीच वर्षाने मुंबई ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अटल सेतूमार्गे ३०-३५ मिनिटात पोहचता येणार आहे.
गावर कन्स्ट्रक्शन लिमिटेडची बाजी
या जोडरस्त्याच्या बांधकामासाठी एमएमआरडीएने निविदा मागविल्या होत्या. या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला. गावर कन्स्ट्रक्शन लिमिटेड, एल & टी, जी.आर.इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड आणि पी एन. सी इन्फ्राटेक या कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. या निविदेत अखेर गावर कन्स्ट्रक्शन लिमिटेडने बाजी मारल्याची माहिती एम.एम आर डी.ए.तील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
शुक्रवारी झालेल्या एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत निविदा मंजूर करत गावर कन्स्ट्रक्शन लिमिटेडला कंत्राट बहाल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.
____________________________________________________________________________________
बातमीच्या या भागाचे प्रायोजक आहेत निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, सांगली. व इस्टेट 99 इंडिया मुंबई.
____________________________________________________________________________________