लोकसंदेश न्यूज मीडिया नेटवर्क
म्हैसाळकर शिंदे सरकारांनी गाडगीळांची वकिली कधीपासून सुरु केली, हे कळत नाही. : मंगेश चव्हाण
सांगली प्रतिनिधी - आमदार सुधीर गाडगीळ निधीचा फुसका बार उडवत आहेत आणि विकासाचा लख्ख प्रकाश पडला म्हणून काही जण उगाच नाचत आहे. त्यांनी अडीच हजार कोटी खरेच आणले असतील तर स्टेशन चौकात आम्ही स्टेज घालतो, तिथे त्यांनी सिद्ध करून दाखवावे. पृथ्वीराजबाबा त्यांच्या प्रयत्नाने आलेल्या निधीचे पुरावे देतील. दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी म्हैसाळ ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद गटावर लक्ष द्यावे, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे माजी नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी दिले.
मंगेश चव्हाण म्हणाले, की म्हैसाळकर शिंदे सरकारांनी गाडगीळांची वकिली कधीपासून सुरु केली, हे कळत नाही. त्यांनी स्वतः काहीतरी काम दाखवावे आणि मग इतरांच्या भानगडीत पडावे. २६५० कोटी रुपयांत सांगलीचे शांघाय झाले असते, हा आमचा दावा आहे. तो तुम्ही खोडून दाखवा. वास्तविक १८०० ते २००० कोटींच्या प्रस्तावित निधीशी आमदारांचा संबंधच नाही, याचे पुरावे आम्ही दिले. त्यानंतर आता ते पालकमंत्री आणि खासदारांचे नाव घेताहेत. गेल्या निवडणुकीत त्यांना निसटता विजय मिळाला. यावेळी भाजप उमेदवार बदलणार, अशी चर्चा आहे, त्यामुळे काहीतरी आदळआपट सुरु आहे. काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला मिळालेला उदंड प्रतिसाद, पृथ्वीराज पाटील यांच्या घरोघरी भेटींनी बदलत असलेले चित्र, विविध उपक्रमांना सांगलीकरांनी दिलेली दाद पाहून भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. काँग्रेसचे नेते आमदार विश्वजीत कदम, आमदार विक्रमसिंह सावंत, विशालदादा पाटील, श्रीमती जयश्री पाटील आणि पृथ्वीराजबाबा यांच्या एकजुटीचा भाजपने धसका घेतला आहे. आमदारांच्या कामाचे श्रेय घेण्याची आम्हाला गरज नाही, उलट महाविकास आघाडीच्या काळात आम्ही आणलेल्या कामांचा समावेश आमदारांनी आपल्या यादीत केला आहे. ते फुकटचे श्रेय घेऊ पहात आहेत. मतांचे ध्रुवीकरण करून आता काही साध्य होणार नाही म्हटल्यावर त्यांनी खोटे रेटायला सुरवात केली आहे. त्याचा आम्ही जागोजागी पंचनामा करू, असा इशारा मंगेश चव्हाण यांनी दिला.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/सांगली.