लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी
महावितरण कार्यालयाचा सहाय्यक लेखापाल लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात...
शेजाऱ्याकडून किराणा दुकानात लाईट कनेक्शन घेतले म्हणून ७० हजार रूपयांचा दंड आकारलेला आहे,असे सांगून तो दंड माफ करण्याकरिता सहाय्यक लेखापाल श्रीकांत भीमराव आवाड यांने तक्रारदार यांच्याकडे सुरुवातीस १५ हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ५ हजार रुपये लाच स्विकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,पुणे कार्यालयाच्या पथकाने श्रीकांत आवाड यांस शनिवारी रंगेहात पकडले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी ,श्रीकांत आवाड पंढरपूर ग्रामीण-२,महावितरण कार्यालयात सहाय्यक लेखापाल वर्ग-३ पदावर कार्यरत आहे. त्यांने एका किराणा दुकानदाराकडे शेजाऱ्याकडून अनधिकृतपणे विद्युत पुरवठा घेऊन नियमभंग केला व नवीन मीटर घेण्यासाठी ७० हजार रुपये दंड आकारल्याचे सांगितले होते. तो दंड माफ करण्यासाठी श्रीकांत आवाड ,वय -३८ , रा.फ्लॅट नंबर १०१, एस -2,किसान संकुल,जुना विडी घरकुल,सोलापूर यांने त्याच्याकडे १५ हजार रुपयाची लाच मागितली, अशी तक्रार पुणे कार्यालयाकडे आली होती. त्या तक्रारीची शहानिशा करून एसीबी पथकाने सापळा लावला होता.
तडजोडीअंती ठरलेली ०५ हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना लोकसेवक आवाड यांस महावितरण कार्यालय, पंढरपूर कार्यालयाच्या आवारात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. याबाबत पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
ही कारवाई मार्गदर्शन अधिकारी अपर पोलीस अधीक्षक डॉ.शीतल जानवे,पोलीस उप अधीक्षक नितिन जाधव (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे,पो.शि.रियाज शेख, पो.शि.दिनेश माने,पो.शि.मंगेश कांबळे,चालक पो.हवा दिवेकर (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,पुणे) यांनी पार पाडली
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.