लोकसंदेश न्यूज नेटवर्क
विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजनेतूनबांधकाम कामगार, कुटुंबियांना आरोग्य सेवा...
- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
महत्त्वाकांक्षी राज्यस्तरीय विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजनेचे उद्घाटन
फिरत्या वैद्यकीय कक्षाचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण....
सांगली, : विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजनेतून गरीब, अशिक्षित, कष्टकरी बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सेवा पुरवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल, असा विश्वास कामगार मंत्री तथा महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे व्यक्त केला.
विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा या राज्यस्तरीय योजनेचा शुभारंभ व फिरत्या वैद्यकीय कक्षाचे लोकार्पण या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन, महापालिका आयुक्त सुनील पवार, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार, अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, एचएलएल लाईफ केअर कंपनीचे डीजीएम रणजीत एम., सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर आदि मान्यवर व्यासपाठीवर उपस्थित होते.
विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा या आरोग्य सेवेशी निगडित महत्त्वाकांक्षी राज्यस्तरीय योजनेचे आज सांगली जिल्ह्यातून उद्घाटन होत असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यासाठी सर्व अद्ययावत सोयी-सुविधांनी युक्त एक फिरता वैद्यकीय कक्ष देण्यात येत आहे. त्याचे पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांसाठी आज प्रातिनिधीक स्वरूपात लोकार्पण करण्यात येत आहे. या वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांची तपासणी ते उपचार होणार आहेत. त्याचा खर्च बांधकाम कामगार मंत्रालय उचलणार आहे.
बांधकाम कामगारांची नोंदणी मात्र एक रूपयामध्ये केल्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यभरात 13 लाख बांधकाम कामगारांची नोंदणी होऊ शकली, असे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात एक कामगार भवन उभारण्यात येणार असून, सांगली जिल्ह्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, 100 खाटांचे ईएसआय रूग्णालय मंजूर करण्यात आले आहे. बांधकाम कामगारांना सेफ्टी किटस् देण्यात आली आहेत. बांधकाम कामगारांनी आरोग्याची काळजी घ्यावी. त्यांच्यासाठी प्रत्येक तालुक्याला सेतू केंद्र सुरू करणे, पाणी, बैठकव्यवस्थेसह नाका शेड उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच, बांधकाम कामगारांनी नोंदणी करून त्यांच्यासाठी असणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
विश्वकर्मा जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरात सुरू केलेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या योजनेंतर्गत 18 पारंपरिक व्यवसायांच्या नोंदीत कारागिरांना प्रधानमंत्री विश्वकर्मा प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात येणार आहे. टूल किट प्रोत्साहन, कौशल्य विकास प्रशिक्षण भत्ता, सवलतीचे व तारणमुक्त कर्ज देण्यात येणार आहे.
विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, बांधकाम कामगार प्रतिकूल, आव्हानात्मक परिस्थितीत काम करत असतात. त्यामुळे त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमिवर बांधकाम कामगारांच्या आरोग्य सेवेसाठी ही योजना उपयुक्त आहे. फिरत्या वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांची तपासणी ते उपचार होणार आहेत. टोल फ्री क्रमांकावर बांधकाम कामगारांच्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे. बांधकाम विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक बांधकाम कामगारांनी नोंदणी करावी, या योजनांचा लाभ घ्यावा व इतर बांधकाम कामगारांपर्यंत या योजना पोहोचवाव्यात, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदीत सक्रिय (जीवित) बांधकाम कामगारांसाठी "विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा" योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या संगणकीय प्रणालीचे उदघाटन पालकमंत्री यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. योजनेचा निःशुल्क १८००-२-६६ ६६ ६६ ६६ टोल फ्री क्रमांकही कार्यान्वित करण्यात आला.
यावेळी पुणे विभागातील सांगलीसह, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर या पाचही जिल्ह्यातील फिरत्या वैद्यकीय कक्षाचे प्रमुख आणि वाहनचालकांना प्रातिनिधीक स्वरूपात चाव्या डॉ. खाडे यांच्या हस्ते प्रदान करून बांधकाम कामगारांसाठी फिरते वैद्यकीय कक्ष (मोबाईल मेडिकल युनिट) चे लोकार्पण करण्यात आले. पात्र नोंदित लाभार्थी बांधकाम कामगारांना, त्यांच्या वारसांना अर्थ सहायाचे धनादेशही त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र गीत गायन करण्यात आले. विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजनेची माहिती देणारा पोवाडा शाहीर बजरंग आंबी व पथकाने सादर केला. विवेक कुंभार यांनी प्रास्ताविक केले. अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी आभार मानले. सूत्रसंचालन राणी यादव यांनी केले. यावेळी जिल्हाभरातून आलेले बांधकाम कामगार उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली..
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.