लोकसंदेश न्यूज
मिरज प्रतिनिधी
राज्यात मागील १२५ वर्षांपासून सहकार क्षेत्राचे चांगले काम सुरू आहे. महाराष्ट्र राज्य सहकार क्षेत्रामध्ये देशात पहिल्या क्रमांकावर आहे. भविष्यातही महाराष्ट्राचे सहकारातील हे स्थान टिकून राहण्यासाठी तरुणांनी या क्षेत्रामध्ये येण्याची गरज आहे. त्यासाठी आजच्या तरुण पिढीला, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहकार क्षेत्राबद्दल प्राथमिक माहिती असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या सहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील यांनी केले. गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक पृथ्वीराज पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
सहकार तपस्वी गुलाबराव पाटील यांची १०२ वी जयंती मिरजेतील गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल येथे साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्याच्या सहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, स्वर्गीय गुलाबराव पाटील यांचे सहकार क्षेत्रातील कार्य खूपच मोठे आहे. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली. गुलाबराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतो. आताच्या पिढीने सहकार क्षेत्र समजून घेतले पाहिजे. शोषण टाळणारे हे क्षेत्र आहे. सहकारातील फायदा हा सभासदांचा असतो. हे सहकाराचे वेगळेपण आहे. सहकाराचे संपूर्ण कामकाज लोकशाही पद्धतीने चालते, असे प्रतिपादन संतोष पाटील यांनी केले. राज्यातील सहकारी चळवळ, त्याची व्याप्ती, क्षमता, राज्याच्या आर्थिक विकासातील योगदान, राज्यातील यशस्वी संस्था यांची माहिती त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.
केंद्र शासनाने सहकार क्षेत्राबद्दल नवी धोरणे आणली आहेत. ती धोरणे सांगली जिल्ह्यामध्ये विशेषपणे राबवली जावीत या उद्देशाने या जिल्ह्याचा माजी डी.डी.आर. म्हणून या जिल्ह्याचे पालकत्व माझ्याकडे घ्यायचे ठरविले आहे, असेही संतोष पाटील पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. प्रस्तावना डॉ. राजेंद्र मेथे यांनी केली. या कार्यक्रमास कवठेमहांकाळ तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गुरव, विश्वस्त डॉ. इकबाल तांबोळी, कॅम्पस कोऑर्डीनेटर सतिश पाटील, प्राचार्य बिभीषन कराळे, साहेबलाल शरीकमसलत, ख्रिस्टीना मार्टीन, श्रीदेवी कुल्लोळी, विनय डोंगरे, अभय गायकवाड, डॉ. आकांशा जोशी, ऋतुराज पाटील, रघुनाथ नार्वेकर उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.