जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी ..
आयुष्मान भव मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ
सांगली, दि. १३:- सामान्य माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने 'आयुष्मान भव' मोहीम अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची आहे. या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढून घ्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज केले.
पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय येथे 'आयुष्मान भव' मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते आला. यावेळी अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, सर्व नागरिकांचे आरोग्य निरोगी रहावे, त्यांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये यासाठी ही मोहीम उपयुक्त ठरेल. नागरिकांना या मोहिमेच्या माध्यमातून वेळेवर वैद्यकीय उपचार घेणे शक्य होणार आहे. जिल्ह्यात क्षय रुग्णांना निक्षय मित्रांमार्फत होत असलेली मदत इतरांसाठी प्रेरणादायी अशी आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यावेळी म्हणाले.
नागरिकाने आरोग्याबद्दल सदैव जागृत असावे... आमदार श्री. गाडगीळ
सध्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे आरोग्याच्या समस्याकडे कोणीही दुर्लक्ष करू नये असे आवाहन करून आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, केंद्र सरकारने 'आयुष्मान भव' ही जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारी मोहीम सुरू केली असून या मोहिमेचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा. जीवनात व्यायामाला महत्त्व देऊन प्रत्येक नागरिकाने आपल्या आरोग्याबद्दल सदैव जागृत असावे. वैद्यकीय सल्ल्यानुसारच औषध उपचार घ्यावेत असेही ते म्हणाले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले व 'आयुष्मान भव' मोहिम जिल्हात कशा प्रकारे राबविली जाणार आहे याची माहिती दिली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय स्तरावर तपासणी केलेल्या व पुढील उपचाराची गरज असलेल्या रुग्णांचे साप्ताहिक आरोग्य शिबिर घेण्यात येईल. या शिबिरात तपासणी केलेल्या रुग्णास आणखी पुढील उपचाराची गरज भासल्यास अशा रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून उपचार केले जातील. 'आयुष्मान भव' ही मोहीम जिल्ह्यात आदर्शवत राबवून जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल, असे ते म्हणाले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. या कार्यक्रमात लाभार्थीना प्रतिनिधिक स्वरुपात आभा कार्ड व एक महिन्याचे औषध किटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच निक्षय मित्रांचा सन्मान व क्षय रुग्णांना मोफत शिधा वाटप करण्यात आले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.