शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत मिरज येथील रोजगार मेळाव्याचे पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या हस्ते उद्घाटन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत मिरज येथील रोजगार मेळाव्याचे पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या हस्ते उद्घाटन



लोकसंदेश न्यूज नेटवर्क

शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत मिरज येथील रोजगार मेळाव्याचे पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या हस्ते उद्घाटन

विकास कामांचा अनुशेष पूर्ण करून मागणीमुक्त गावांची संकल्पना राबविण्याचा निश्चय
- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे 

सांगली दि. १ :- गावातील विकास कामे आणि गावांसाठी असणाऱ्या आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. गावांच्या विकास कामांचा अनुशेष पूर्ण करून मागणी मुक्त गावाची संकल्पना राबविण्याचा निर्धार करण्यात आला आहे, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी मिरज येथील रोजगार मेळाव्यात केले.



शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथील मातोश्री तानुबाई दगडू खाडे  इंग्लिश स्कूल येथे आयोजित पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. रोजगार मेळावा उद्घाटन प्रसंगी महापौर दिग्विजय सुर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, कामगार आयुक्त सतिश देशमुख, महापालिका आयुक्त सुनील पवार, पालकमंत्री यांच्या सुविद्य पत्नी सुमनताई खाडे, पालकमंत्री यांचे खाजगी सचिव गोपिचंद कदम,  ‍विशेष कार्य अधिकारी रणजित देसाई, ‍विशेष कार्य अधिकारी प्रमोद फडणीस, मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूलचे सचिव प्रा. मोहन वनखंडे, महानगरपालिका समाज कल्याण सभापती अनिता वनखंडे, माजी महापौर संगीता खोत, तहसिलदार अपर्णा मोरे, अपर तहसिलदार अर्चना पाटील, सहायक कामगार आयुक्त मुजम्मिल मुजावर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, विविध  कंपन्यांचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.



पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, त्यांच्या हाताला काम मिळावे, त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारावी हा उद्देश ठेवून शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये 69 कंपन्या सहभागी झाल्या असून या कंपन्यांमध्ये 3 हजार रिक्त पदांसाठी बेरोजगार युवकांच्या विविध पदासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पात्र उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊन त्यांच्या अनुभवाच्या शिदोरीत वाढ होऊन त्यांच्यात नवीन उमेद निर्माण होईल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. खाडे यांनी यावेळी व्यक्त केला. पालकमंत्री डॉ. खाडे पुढे म्हणाले, युवकांनी मोठे ध्येय बाळगावे आणि या ध्येयाच्या पूर्तीसाठी कष्टाची तयारी ठेवावी. आपण स्वतःही एक कामगार होतो. त्यामुळे कष्टाची जाणीव आपल्याला आहे. सामान्य माणसाचे कष्ट कमी करण्यासाठी आपण मिळालेल्या संधीचे सोने करू. जत येथून एक वेळा आणि मिरज येथून तीन वेळा आमदार म्हणून जनतेने सेवा करण्याची संधी दिली. जनतेने आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला विकास कामांच्या माध्यमातून उतराई होण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या महामंडळाच्या स्टॉलचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
मिरज येथील या रोजगार मेळाव्यातून बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात रिक्त जागा कळवून  बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. बेरोजगार युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या प्रसंगी केले.
या मेळाव्याच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. रोजगाराच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाची आर्थिक उन्नती  होईल, असा विश्वास प्रा. मोहन वनखंडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे जमीर करीम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रोजगार मेळाव्यासाठी सुमारे 69  कंपन्या सहभागी झाल्या  आहेत. या मेळाव्यात विविध कंपन्यांमध्ये 3 हजार रिक्त पदासाठी मुलाखती घेतल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत 3 हजार 513 कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात येऊन यासाठी बँकेकडून 267 कोटी 89 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे आणि महामंडळाकडून या कर्जापोटी 24 कोटी रुपयांचा व्याज परतावा करण्यात आल्याची माहिती महामंडळाच्या व्यवस्थापक निशा पाटील यांनी दिली.  
रोजगार मेळाव्यात अतुल किसन पाटील यांना 4 लाख 50 हजार, सतीश दिनकर मोहिते यांना 4 लाख 50 हजार, विशाल आनंदा पाटील यांना 1 लाख 50 हजार, उदय आप्पासाहेब शिंदे यांना 3 लाख, संतोष निशिकांत शिंदे यांना 4 लाख 50 हजार,  मनीषा संतोष शिंदे 4 लाख 50 हजार, भास्कर तानाजी पाटील 2 लाख 50 हजा, बजरंग यशवंत पाटील 3 लाख, संपत तुकाराम माने 75 हजार, गजानन साळुंखे 4 लाख 50 हजार, प्रशांत सावंत 3 लाख, सोहन संभाजी पाटील 1 लाख 75 हजार, महादेव पुंडलिक जाधव 4 लाख 50 हजार, रोहित अनिल मस्के 2 लाख, प्रवीण मोहन पवार 1 लाख 50 हजार, प्रदीप श्रीकांत पाटील 3 लाख, गोपाळ शिवाजी पाटील 3 लाख 25 हजार, वैशाली अमर खोत 75 हजार, प्रसाद भगवान जाधव 4 लाख 50 हजार आणि गोरखनाथ मारुती कदम यांना 2 लाख रुपयांचा व्याज परतावा देण्यात आल्याचे प्रमाणपत्र पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुमनताई खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई