मुंबई: लोकसंदेश न्यूज नेटवर्क
सांगली मधील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर झाल्याने आवश्यक कार्यवाही करणेबाबत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
सांगली 6 जून 23 :- मागील काही दिवसापासून सांगली जिल्हयातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. जिल्हयात अनेक ठिकाणी खून व दरोडयाच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणाव झाली आहे. भरदिवसा दरोडे पडत आहेत. लुटमार केली जात आहे. स्त्रियावरील अत्याचारांचे प्रमाण देखील खूप वाढले आहे. नशेखोरीचे प्रमाण वाढले असून तरुण नशा करुन चोरी लूटमार करत आहेत. अश्या अनेक घटनांनी संपूर्ण जिल्हयामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्यामध्ये प्रचंड भितीचे वातावरण तयार झाले आहे.
रविवार दिनांक ४ जून २०२३ रोजी भर दिवसा सांगली येथील रिलायन्स ज्वेल या सोन्याचांदीच्या दुकानावरती दुपारच्या वेळेत 10-15 लोकांच्या टोळीने दरोडा टाकला. पोलीस आहोत असे सांगून दुकानात प्रवेश केला. सर्वांच्याकडे शस्त्र होती. सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र करुन सोने, चांदी, हिरे, रोकड, मोबाईल अशी करोडो रुपचांची चोरी करुन हे चोर पश्यार झाले. कर्मचाऱ्यांना शस्त्रांचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. एका ग्राहकांवरती गोळी झाडण्यात आली.
हे शोरुम जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरतीच आहे. या घटनेच्या काही दिवस अगोदरच कवठेपिरान येथे देखील दरोडयाची मोठी घटना घडली आहे. शिराळा तालुक्यातील निगडी येथे देखील दरोडा टाकून वृद्ध दांपत्यांना जिवे मारण्यात आले. दोन दिवसांपूर्वी सांगली येथेच एका नगरसेवकावरती खूनी हल्ला करण्यात आला. या लोकप्रतिनिधीकडे स्वतःचे शस्त्र असल्याने तो बचावला. मात्र त्याची गाडी फोडून टाकण्यात आली. काही दिवसापूर्वी मिरज येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला.
मटका व सट्टा यांचे प्रमाण वाढले आहे. अनेक कॉलेज तरुण तरुणी कॉलेजमध्ये तसेच आसपासच्या कॅफेमध्ये नशा करत आहेत. साखळी चोरीच्या अनेक केसेस घडत आहेत. सावकारी मोठया प्रमाणात वाढली आहे. बनावट २००० च्या नोटा चलनात आणल्या गेल्या मात्र याच्या मुख्य सुत्रधारांस अद्याप अटक करण्यात पोलीसांना यश आलेले नाही. मागील काही दिवसांत मिरज येथे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेचा इतका बोजवारा उडाला असताना पोलीस प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. पोलीसांचा कसलाही वचक राहिलेला दिसत नाही. दिवसा ढवळया चोर चोरी करुन जातात आणि पोलीसांना याची कल्पनाही नाही. चोरीच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्याची तसदीही पोलीसांनी घेतली नाही. पोलीसांच्या या निष्क्रियतेच्या विरोधात लोकांनी आंदोलने करायला सुरुवात केली आहे.
सांगली जिल्हयातील कायदा व सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती पहाता याची चौकशी करावी, या बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या वरती कारवाई करावी तसेच ही परिस्थिती पूर्ववत व्यवस्थित होणेकरिता आवश्यक ती कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केली आहे यावेळी उपमुख्यमंत्री यांनी संबंधितावर कठोर कारवाई करू असे आश्वासन आमदार गाडगीळ यांना दिले..
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई