लोकसंदेश न्यूज नेटवर्क
सांगली:गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारची चित्ररथाद्वारे प्रचार व प्रसिद्धी
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी चित्ररथास दाखविला हिरवा झेंडा....
सांगली दि. १८ :- जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या प्रचार व प्रसारासाठी चित्ररथ तयार करण्यात आले आहेत. या चित्ररथाना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी आज हिरवा झेंडा दाखवून गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाच्या प्रचार व प्रसिद्धीचा शुभारंभ केला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमास रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी दिपक शिंदे, सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी एस. एस. होवाळे भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी माजी महापौर सुरेश पाटील, राजगोंडा पाटील, धन्यकुमार शेट्टी, महावीर कवटगे, दिपक पाटील, व जिल्हा प्रतिनिधी विकास शेळके उपस्थित होते.
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना जागृतीसाठी भारतीय जैन संघटना सहयोग करणार आहे. प्रचार रथावर सर्व प्रचार साहित्य तसेच कार्यक्रमाचे गाणे, जिंगल, घोषणा आणि संवाद जनजागृतीसाठी तयार केले असून हा प्रचार रथ सांगली जिल्ह्यातील गावागावात जाऊन या योजनेत सहभागी होण्यासाठी जनजागृती करणार आहे.
या योजनेमधून धरणामध्ये साचलेला गाळ उपसा करून धरणाची मूळ साठवण क्षमता पुनर्स्थापित होणार आहे. उपसा केलेला गाळ शेतात पसरविल्यास शेतीची उत्पादन क्षमता वाढणार आहे. यासाठी सांगली जिल्ह्यातील धरणातून गाळ उपसा करण्यासाठी जास्तीत जास्त अशासकीय संस्थांनी योजनेत सहभाग घ्यावा व प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.
या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अशासकीय संस्थांना यंत्रसामग्री आणि इंधन या दोन्हीचा खर्च देणे प्रस्तावित आहे तसेच अल्प व अत्यल्प भूधारक विधवा अपंग आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेचा पुरेपूर लाभ घेता येईल याकरीता अनुदान देण्यात येणार आहे. अशासकीय संस्थांना गाळ काढण्यासाठी लागणारी यंत्र सामग्री आणि इंधन याकरिता 31 रुपये प्रति घनमीटर व पात्र शेतकऱ्यांना शेतात गाळ पसरवण्यासाठी 35.75 रुपये प्रति घनमा याप्रमाणे एकरी 15000 च्या मर्यादेत व 2.5 एकर (रुपये 37 हजार 500 पर्यंत) अनुदान दिले जाणार आहे.
गाळमुक्त धरण व गाळ युक्त शिवार अभियानामध्ये सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अशासकीय संस्थांनी तालुका निहाय संबंधित उपअभियंता यांच्याशी संपर्क करून शेतकऱ्यांची मागणी असलेल्या जलसाठ्याची माहिती घेऊन व संबंधित ग्रामपंचायत ठराव सोबत घेऊन सदस्य सचिव जिल्हास्तरीय समिती, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृदू व जलसंधारण विभाग, वारणाली, विश्रामबाग सांगली येथे प्रस्ताव सादर करावेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.