◾मनातला मन्या !
_______________
जे . डी . पराडकर* 9890086086
अघटित या शब्दाचा खराखुरा अर्थ कळणारी घटना बुधवारी घडली . या दुर्दैवी घटनेवर अजूनही विश्वास बसत नाही अथवा हे सत्य स्वीकारायला मन तयार होत नाही . अवघे ४२ वय , अगदी उमेदीचे आणि स्वतः मधील साऱ्या कौशल्यांना सर्वांसमोर आणण्याचे . अशा वयात कोणी अर्ध्यावर डाव सोडला तर , मन सुन्नच होणार . बुधवारी संगमेश्वर न्यूजच्या समुहावर संदेश सप्रे यांचे दु:खद निधन हा संदेश वाचला आणि पार कोलमडून गेलो . कशातच मन लागेना . अखेरीस या दुर्दैवी घटनेचा सविस्तर वृत्तांत कळल्यानंतर हे सारे खरे आहे आणि आज जणू आपला एक हातच निखळून पडल्याची जाणीव झाली . मन आणि नेत्र एकाचवेळी भरून आले . बरोबर महिन्यापूर्वी माजी आमदार सुभाष बने यांच्या सह्याद्रिनगर देवरुख येथील कार्यालयात एका बातमीच्या निमित्ताने संदेशची जवळपास तासभर भेट झाली होती . त्यावेळी ही भेट अखेरची ठरेल अशी पुसटशी कल्पनाही नव्हती . त्यानंतर महिन्याभरात प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी , दररोज बातम्यांच्या निमित्ताने आमचे संदेशवहन सुरू होते . पत्रकारिता आणि सप्रे कुटुंब यांचे एक घट्ट नाते आहे . नरेश सप्रे पासून पत्रकारिता क्षेत्रात सप्रे या नावाचा दबदबा सुरू झाला . नरेश संगमेश्वरला असल्यामुळे आमच्या नित्यनेमाने भेटी होत आणि विविध विषयांवर चर्चा रंगत असे . या चर्चेत अनेकदा शिरीष दामले , डॉ . शेकासन , प्रशांत कोकाटे , विलास होडे , सुरेश सप्रे , दादा जाधव यांचा समावेश असायचा . अनुभवी मंडळींकडून होणाऱ्या मार्गदर्शनातून आम्ही घडत होतो . याच दरम्यान नरेश आम्हाला अचानक सोडून गेला आणि पत्रकारितेत मोठी पोकळी निर्माण झाली . पुढे नरेशचे चुलत भाऊ समीर , चिंतामणी यांनी ही पोकळी भरून काढली असली तरी , नव्या दमाच्या संदेशशी आमचे घट्ट नाते जुळले . संदेश हा बातमी कळणारा पत्रकार होता . बातमीसाठी जी तळमळ असावी लागते , ती संदेश जवळ ओतप्रोत भरलेली होती . दिवसभरात अधिकाधिक बातम्या करण्याचे आम्ही व्रतच केले होते . नरेश सारखीच सामाजिक भान असणारी पत्रकारिता करणारा तरुण म्हणून संदेशने स्वतःची ओळख निर्माण केली आणि नरेश सारखीच परत एकदा आमची साथ अर्धवट सोडली . संदेशने अर्ध्यावर आमची साथ सोडताना असंख्य मंडळींना जो काही संदेश दिला आहे , त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे .*
जांभूळ अगोड झाले ' हा लेख मंदार भिडे ज्या दिवशी गेला त्या दिवशी मध्यरात्री ३ वा . मी लिहिला होता . मंदारची ओळख संदेश मुळेच झाली होती . मंदार हा पत्रकार मंडळींच्यात वावरणारा मोकळ्या मनाचा मित्र होता . त्याचे अचानक जाणे धक्कादायक असल्याने त्या रात्री झोपच येत नव्हती . अखेरीस मध्यरात्री दोन वाजता मंदारवर लेख लिहायला घेतला त्यानंतर तासाभराने मन काहीसे थाऱ्यावर आले . मंदार भिडेचा जांभळांवर प्रक्रिया करण्याचा व्यवसाय असल्याने मंदार वरील लेखाचे शीर्षक ' जांभूळ अगोड झाले ' असे केले . त्या दिवसा पासून मी जांभूळ खाणेच सोडून दिले . मंदारची ओळख करून देणारा संदेश असाच अचानक सोडून गेला आणि माझे शब्दच गोठले . गेले चार दिवस मी निश:ब्द झालो होतो . काहीच सुचत नव्हते . माझ्या पत्रकार मित्रांनी संदेश बाबत आपल्या भावना लिहिल्या , मी त्या वाचल्या देखील तरीही संदेशवर आठवणींचा लेख लिहायला शब्द बळच मिळत नव्हते . काही मित्रांनी संदेशवर लिहिण्यासाठी फोन केले , काहींनी व्हॉटस ॲपवर संदेश पाठवले . तरीही जो प्रसंग मनाने स्वीकारलेला नाही , त्यावर वास्तव लेखन करायला मन तयार होत नाही . आठवड्याला अन्य प्रसंगी माझा रविवारचा लेख गुरुवारीच लिहून तयार असतो . या आठवड्यात बुधवारी संदेश गेला आणि मला लेखन करायला शब्द आणि विषयच सुचेना अशी अवस्था झाली . अखेरीस या रविवारी लेख लिहायचाच नाही असाही निर्णय घेतला . मात्र शनिवार सकाळ उजाडली आणि संदेश गेल्याचे सत्य स्वीकारायचे असेल तर , रविवारचा लेख त्याच्यावरच लिहायचा असे ठरविले . ' मनातला मन्या ' असे उत्स्फूर्त शीर्षक आले आणि शब्दांची जुळवाजुळव सुरू झाल्यानंतर भरल्या नेत्रांनीच मनातल्या मन्याला वाट मोकळी करून दिली .
' संदेश ' हे आपले नाव त्याने आपल्या लेखणीतून सार्थ केले . तो बातमीदारी करत असलेल्या पेपर व्यतिरिक्त अन्य पेपर मध्ये कधी एखादी बातमी द्यायची झाली तर , तो मनोहर सप्रे असे नाव लिहायचा . संदेशचे टोपणनाव मन्या म्हणून त्याने मनोहर हे नाव धारण केले होते का ? यावर आमची कधी चर्चा झालेली नाही . मी त्याला कधीही संदेश या नावाने हाक मारलेली नाही . मन्या हे नाव माझ्या मनाला मान्य झाले आणि त्याचे माझे नाते भावासारखे बनले . त्याच्या पत्रकारितेचा कालावधी किती ? यापेक्षा त्याची पत्रकारिता जरब बसविणारी होती हे माझ्यादृष्टीने अधिक महत्वाचे होते . पत्रकारिता करताना कोणाचीही भीडभाड ठेवायची नाही , हा गुण त्याने वडील बंधू सुरेश कडून घेतला होता . निर्भीड मनाचा मन्या पत्रकारिता करताना शिरीष दामले आणि मला अगदी अखेरपर्यंत वचकून होता . एखाद्या गंभीर विषयावर लिहायचे झाले की शिरीषला अथवा मला मन्या हमखास फोन करायचा . ' प्रेस कार्ड ' शिवाय स्वतःची ओळख आपल्या लेखणीने करण्यावर मन्याचा विश्वास होता . वृत्तपत्राला बातमीदाराची गरज असली पाहिजे , असे क्रांतीकारी विचार त्याच्या लेखणीच्या जोरावरच त्याच्यात निर्माण झाले होते . या विचारांजवळ तो अखेरपर्यंत ठाम राहिला . त्याचा स्वभाव काहीसा करारी असल्याने एकदा एखादी गोष्ट मनात आली की ती पूर्णत्वास जाईपर्यंत तो अस्वस्थ असायचा. अशा वेळी जरी नुकसान झाले तरी , त्याला सामोरे जाण्याची त्याची तयारी असायची .
लेखनाची नुसती आवड असून लेखन दर्जेदार होत नाही. त्यासाठी चौकस असावे लागते आणि अभ्यासही असावा लागतो . बातमी म्हणजे निबंध वाटता कामा नये . मन्या हा बातमीचे मूल्य कळणारा पत्रकार होता . सकाळ पेपरने संदेशला चांगला प्लॅटफॉर्म दिला . तत्कालीन आवृत्ती प्रमुख प्रमोद कोनकर यांनी संदेशला काम करताना पूर्ण स्वातंत्र्य दिले होते . लॉकडाऊनच्या कालावधीत तर संदेशने केलेल्या ऑफबीट बातम्या चांगल्याच चर्चिल्या गेल्या . एखाद्या दिवशी कोणतीही बातमी नसेल तर , तो ऑफबीट बातम्या तयार करायचा . या बातम्यांसाठी वाचक आवर्जून पेपर विकत घ्यायचे . बातमीदारीच्या क्षेत्रात हळूहळू बदल झाले आणि बातम्या हाताने लिहिण्याच्या पध्दतीला पर्याय उपलब्ध झाल्यानंतर कोणत्याही क्लासला न जाता मन्या मराठी टायपींग शिकला . संगमेश्वर देवरुख परिसरात लॅपटॉपवर बातम्या टाईप करून पाठवणारा संदेश हा पहिलाच पत्रकार होता . याबाबतीत संदेश असो अथवा कोंडिवरे येथील आमचा पत्रकार मित्र जाकीर शेकासन असो हे आम्हाला मागे टाकून खूप पुढे गेले होते. लॅपटॉपवर बातम्या टाईप करण्याचा मन्याचा वेग कौतुकास्पद होता . आम्ही टाईप करू शकत नाही याची खंत मनात असल्याने स्वतःचा लॅपटॉप समोर ठेवून मन्याने आम्हाला टायपिंगचे धडे दिले . कोणत्याही राजकीय सभांना गेल्यानंतर मन्याने कधीही मुद्दे लिहून घेतलेले नाहीत. मोठ्या राजकीय सभा अक्षरशः त्याच्या अंगात भिनायच्या . बातमी करताना आम्ही समोर असलो की बातमीतील ठळक मुद्दा कोणता आहे ? याची पूर्ण जाण असताना देखील , ' सर पहिला मुख्य पॅरेग्राफ सांगा , बाकीची बातमी मी करतो .' असे म्हणण्याचा नम्रपणा त्याच्याकडे होता . आम्ही बातमी करताना एकत्र असलो की त्याने मुख्य मसुदा सांगा , हे तत्व कधीही सोडले नाही . म्हणून मन्या नेहमीच काळजाला भिडत गेला .
कोणत्याही मोठ्या व्यक्तीजवळ बातमीसाठी बोलायचे झाले की मन्याची ओळख असूनही तो बोलण्याचा मान आम्हाला द्यायचा . ओळख आहे म्हणून पुढे पुढे करणे , फोटोसाठी धावणे अशा गोष्टी त्याला कधी शिवल्याच नाहीत . स्वतःची ओळख आपल्या लेखणीच्या सामर्थ्यातून करण्यावर त्याचा विश्वास होता . अगदी अखेरपर्यंत त्याने आपले या तत्वाला छेद दिला नाही . एखादा वेगळा विषय मन्याला सुचला तर मला फोन करून सांगायचा सर , यावर तुम्ही छान लिहाल ! हा विषय तुम्ही फुलवा आणि मला पण द्या . बातमीदारीतील ही देवाणघेवाण आमच्यात बऱ्याचदा चालायची . ज्याच्याकडे लिहिण्याची क्षमता आहे त्याने असे करण्यात काहीच गैर नाही असे आमचे दोघांचेही मत होते . मी काही कामानिमित्त बाहेरगावी गेलो तर माझ्या पेपरला माझ्या इमेलवरून तो सलग आठ – दहा दिवस बातम्या पाठवायचा . सहकार्याच्या बाबतीत तो नेहमीच पुढे असे . तालुक्यातील पत्रकारांनी एकत्र यावे , एकत्र वावरावे , अभ्यासदौऱ्यासाठी एकत्र जावे , विविध सामाजिक उपक्रम राबवावे , कार्यशाळा घ्याव्यात यासाठी त्याची सतत धडपड आणि पुढाकार असायचा . पत्रकारिता क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचा तो अनेकदा मानकरी ठरला . मात्र स्वतःहून यासाठी अर्ज करणे त्याला मान्यच नसायचे . पत्रकार मित्रांच्या आग्रहाखातर तो बातम्यांची कात्रणं जमवायचा . आपल्या लेखणीच्या माध्यमातून वाचकांना नवीन काहीतरी वाचायला देणे , अन्यायाला वाचा फोडणे अशी सामाजिक भान असलेली पत्रकारिता करून त्याने वाचकांच्या मनात स्थान मिळवत आपलेपणाचा पुरस्कार मिळविण्यात नेहमी समाधान मानले .
भारदस्त उंची , सावळा वर्ण , मोजके शब्द , चेहऱ्यावर नेहमीच स्मितहास्य , सतत धावपळ , आवाजातील मार्दव , अभ्यासू वृत्ती , वाचनाची आवड , नव्याचा ध्यास , डोळ्यावर नेहमी गॉगल , नवनवीन ब्रॅंडच्या कपड्यांची आवड , चांगल्याला चांगले म्हणण्याचा मनाचा मोठेपणा, मैत्री जोडण्याची आणि जपण्याची खास आवड , बातमीसाठी कितीही कष्ट घेण्याची तयारी , पत्रकार म्हणून वेगळी वागणूक मिळावी अशी अपेक्षा न करणारा , निर्भिड , स्पष्टवक्ता , कार्यक्रमात बोलायला बिचकणारा , मोकळ्या मनाचा आणि घरात सर्वांचा लाडका असे विविध पैलू मन्याच्या अंगी होते . त्याच्या बोलण्यातून मला अनेकदा त्याच्या वडिलांचा भास व्हायचा . एकदा लॅपटॉपवर बातम्या करत असताना मला सहज बोलून गेला सर , मला अधिस्वीकृतीधारक पत्रकार व्हायचे आहे . पत्रकारितेत येणाऱ्या प्रत्येक नवोदित पत्रकाराला 'प्रेस कार्ड ' प्राप्त करण्याची मोठी मनिषा असते . काही वर्तमानपत्र अशी ओळखपत्रे देतात तर , काही देतही नाहीत . अधिस्वीकृतीधारक पत्रकार होणं म्हणजे शासनाच्या यादीत नाव समाविष्ट होत असते . अधिस्वीकृती मिळविण्यासाठीचे नियम काटेकोर असल्याने आणि तो काम करीत असलेल्या पेपरकडून तांत्रिक दृष्ट्या ते मिळणे अशक्य असल्याने अखेर रत्नभूमीच्या धनाश्रीताई पालांडे यांच्याकडे मी संदेशसाठी शब्द टाकला आणि त्या संदेशचे बातमीदारीतील काम आणि वलय पाहून लगेच तयारही झाल्या . विशेष म्हणजे पुढील दोन महिन्यात संदेशकडे अधिस्वीकृती कार्ड आले देखील . कार्ड प्राप्त होताच किमान दहा वेळा तरी मला म्हणाला , तुमच्या प्रयत्नांमुळे मी अधिस्वीकृतीधारक पत्रकार झालो . त्याच्या या वाक्यावर मी त्याला प्रत्येकवेळी सांगितले की तुझी ती क्षमता आहे म्हणून तू अधिस्वीकृती प्राप्त करू शकलास .
संदेशने आपल्या लेखनातून न्याय मिळवून दिलेले अनेक विषय आहेत . या विषयांचा आढावा घेत राहिलो तर , लेखनाला जागा कमी पडेल . कोकणच्या विविध विषयांवर त्याने भरभरून लेखन केले . कोकणवर लेखन करणे हे आमच्या दोघांच्याही आवडीचे असल्याने आम्ही जिल्ह्यात एकत्र असा खूपच प्रवास केला . आमच्या दोघांची मनं जुळल्यापासून आम्हा दोघात कधी शाब्दिक , वैचारिक वाद झाला नाही. आमचे विचार एकच असल्याने एकदाही वादाचा मुद्दा उपस्थित झाला नाही . बातमीदारी करताना जेव्हा सोशल मिडिया लोकप्रिय होऊ लागला त्यावेळी ' संगमेश्वर न्यूज ' या नावाने न्यूज पोर्टल सुरू करून अल्पावधीतच संगमेश्वर न्यूजचे जवळपास ५० पेक्षा अधिक समूह तयार झाले . महाराष्ट्राच्या विविध भागातच नव्हे तर , संगमेश्वर न्यूज सातासमुद्रापार पोहचविण्यात संदेश यशस्वी झाला . बातमी वर्तमानपत्रात प्रसिध्द झाली तरीही ती ' संगमेश्वर न्यूजला ' यावी असा वाचकांचा आग्रह असायचा . ब्रेकिंग न्यूज यासाठी संगमेश्वर न्यूजची ओळख मन्याने करून दिली . सोशल मिडिया हाताळण्यात तर तो अव्वल होता . फेसबुक येताच सर्वप्रथम त्याचा वापर करून कोकणातील अनेक गोष्टी त्याने सर्वदूर पोहचवल्या . नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर तो लीलया करत असे . विशेष म्हणजे हे ज्ञान स्वतःपुरते मर्यादित न ठेवता आपल्या समूहाच्या माध्यमातून सर्वांना देण्यात आनंद माने . क्षणार्धात संदेशवहन करण्याचे काम मन्याने आपल्या मित्रांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडले . याच न्यूज पोर्टलवर त्याच्या अकाली निधनाची बातमी वाचायला मिळावी यासारखे दुसरे दुर्दैव नाही . बुधवारी त्याला श्रध्दांजली वाहणारे संदेश शेकडोंच्या संख्येने सर्व समूहांवर पडत होते . बातमीदार ते उपसंपादक अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडणारा संदेश आवृत्ती प्रमुख म्हणून काम करण्याच्या पात्रतेचा होता . मन्याच्या अकाली जाण्याने माझा एक हातच निखळला आणि लेखणी थिजून गेली . गुरुवार पासून आजवर कधीही झाला नाही एवढा संगमेश्वर न्यूजचा समूह शांत झालाय . याच समूहावर मन्यावर असा लेख लिहिण्याची वेळ आली हे अत्यंत दुर्दैवी आहे . संदेशच्या अकाली जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झालीय . माझ्या मनातला मन्या आता नाहीये हे जरी सत्य असले तरी , ते स्वीकारणे अवघड आहे . संदेश जातानाही अनेकांना खूप मोठा संदेश देवून गेलाय . मन्याच्या अकाली जाण्याने कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झालीय.
jdparadkar@gmail.com
_____________________________________
संदेश उर्फ मन्या यास लोकसंदेश मिडिया कडून भावपूर्ण श्रद्धांजली....
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली