पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचा श्रीरामनवमी स्तुत्य उपक्रम
-- आमदार सतेज पाटील
श्रीरामाच्या ५१ फुटी प्रतिमेचे दर्शन
सांगली, दि. ३१ :
श्रीरामनवमीनिमित्त कृष्णा नदीकाठी उभारलेल्या प्रभू श्रीरामाच्या ५१ फुटी प्रतिमेचे काँग्रेसचे नेते आमदार सतीश उर्फ बंटी पाटील यांनी आज दर्शन घेतले. पृथ्वीराज पाटील फाउंडेशनने घेतलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून श्रीरामाचा सत्य विचार यानिमित्ताने सर्वदूर पसरू दे, अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली.
यावेळी सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, आमदार विक्रम सावंत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई पाटील हे प्रामुख्याने उपस्थित होते.
श्रीरामनवमीनिमित्त पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने गुरुवारी दीपोत्सव सोहळा, महाआरती, आतषबाजी आणि 'राम रंगी रंगला' हा भक्ती गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला महिला आणि युवकांची प्रचंड संख्येने गर्दी होती. अत्यंत भारावलेल्या वातावरणात आणि प्रचंड उत्साहात हा कार्यक्रम झाला. श्रीरामाची ५१ फुटी प्रतिमा हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. लोक मनोभावे श्रीरामाचे दर्शन घेत होते. यावेळी नरसिंहवाडीच्या ब्रह्मवंदाने मंत्रपठण केले. श्रीराम आणि महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या कृष्णा नदीची आरतीही यावेळी झाली. परमपूज्य श्री. गुरुनाथ कोटणीस महाराज या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. या भक्तीमय वातावरणातील कार्यक्रमाचा सांगली शहर आणि आसपासच्या गावांतील लोकांनी उस्फूर्त सहभाग घेतला.
श्रीरामाची ५१ फुटी प्रतिमा निर्माण करणाऱ्या ईगलच्या संतोष तावशी आणि संजय गवळी यांचा आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तसेच विसावा मंडळाच्या संजय चव्हाण आणि समर्थ शेळके यांचाही श्री. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली.