विना परवाना व्यवसाय करणाऱ्या बेदाणा वॉशींग व रिपॅकींग सेंटरवर
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
सांगली, दि. 27, : अन्न व औषध प्रशासनाने कुपवाड एमआयडीसी सांगली येथील विना परवाना व्यवसाय करणाऱ्या बेदाणा वॉशींग व रिपॅकींग सेंटरची तपासणी करून या सेंटरवर कारवाई केली. अशी माहिती सहाय्यक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी दिली.
जिल्ह्यामध्ये सध्या बेदाणा उत्पादनाचा कालावधी असल्याने बरीच नविन बेदाणा वॉशींग व रिपॅकींग सेंटर कार्यरत झाली आहेत. या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती फावडे व श्री. स्वामी यांच्या पथकाने कुपवाड एमआयडीसी सांगली येथील विजय संजय सावंत यांच्या मालकीच्या मे. ओमी सेल्स कॉर्पोरेशन, रंजीत शिवाजी मुळीक यांच्या मालकीच्या मे. बाबा ड्राय फ्रुटस व अशोक चौगुले यांच्या मालकीच्या मे. चौगुले ट्रेडींग या तीन बेदाणा वॉशींग व रिपॅकींग सेंटरची तपासणी केली. तपासणी दरम्यान या पेढ्यांना परवाना नसल्याचे व वॉशींग सेंटरमध्ये अस्वच्छता असल्याचे आढळले. मे. ओमी सेल्स कॉर्पोरेशन या पेढीमध्ये बेदाणा वॉशींग करीता डीटर्जेंट पावडर वारली जात असल्याचे आढळल्याने सदर पेढीमधून बेदाणा व डीटर्जेंट पावडर (अपमिश्रक) यांचे नमुने विश्लेषणाकरीता घेवून 7 लाख 67 हजार 210 रूपये किंमतीचा बेदाण्याचा उर्वरीत 4 हजार 513 कि.ग्रॅ. साठा जप्त करण्यात आला. मे. बाबा ड्राय फ्रुटस व मे. चौगुले ट्रेडींग या पेढ्यांमध्ये रिपॅकींग केल्या जात असलेल्या बेदाणा पॅकींग लेबलवरती अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत आवश्यक असलेला उत्पादनाचा / रपिॅकींगचा पत्ता, रिपॅकींग व मुदतबाह्य दिनांक, न्युट्रीशनल माहिती, बॅच नंबर, परवाना क्रमांक इत्यादी नमुद नसल्याने दोन्ही सेंटरना त्यांचा व्यवसाय थांबविण्याची नोटीस देण्यात आली आहे.
तसेच कुपवाड एमआयडीसी येथील मे. सांगली ट्रेडींग व श्री दत्त कोल्ड स्टोरेज या पेढ्यांची तपासणी केली. मे. सांगली ट्रेडींग कंपनी विना परवाना व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आल्याने तसेच विक्री करीता साठविलेल्या बेदाणा पॅकींग लेबलवरती आवश्यक मजकूर नसल्याचे आढळल्याने सदर पेढीस व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे. श्री दत्त कोल्ड स्टोरेज ही पेढी देखील विना परवाना व्यवसाय करीत असल्याचे व मुदतबाह्य अन्न पदार्थांचा साठा साठविल्याचे आढळल्याने कीड लागलेली पेंडखजुर या अन्न पदार्थांचे 5 कि.ग्रॅ. चे 110 बॉक्स नष्ट करण्यात आले. या पेढीस व्यवसाय थांबविण्याची नोटीस देण्यात आली आहे.
बेदाणा तयार झाल्याचे ठिकाण, त्याचा उत्पादनाचा कालावधी याबाबतची ग्राहकांना माहिती होण्याकरीता तसेच अन्न विषबाधा व अन्न पदार्थांच्या गुणवत्तेबाबत तक्रारीच्या घटनांमध्ये तपास करण्याकरीता लेबल वरील माहिती ही अत्यंत महत्वाची असते. सांगली जिल्हा बेदाणा उत्पादनामध्ये अग्रेसर जिल्हा असल्याने जिल्ह्यामधील बेदाण्याला राष्ट्रीय तसेच जागतिक पातळीवर ओळख निर्माण करण्याकरिता लेबल वरील मजकूर अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे सर्व बेदाणा वॉशींग व रिपॅकींगचा व्यवसाय करणाऱ्या अन्न व्यवसायीकांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत परवाना घेतल्या शिवाय व्यवसाय करू नये. बेदाणा पॅकींग लेबल वरती कायद्याने आवश्यक मजकुर नमुद करावा. बेदाणा वॉशींग करीता कायद्याने परवाना दिलेल्या घटकांशिवाय कोणत्याही केमिकल्स, डिटर्जेंटचा वापर करू नये. पुढील कालावधीमध्ये मोहिम तीव्र करण्यात येणार असून जास्तीत जास्त वॉशींग व रिपॅकींग सेंटरची तपासणी करण्यात येणार आहे. ग्राहकांनी कोणतेही अन्न पदार्थ खरेदी करताना लेबल वरील मजकूर तपासूनच तो खरेदी करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.