लोकसंदेश प्रतिनिधी
बेडगेत दोन मुलांचा तळ्यात बुडून मृत्यू.
मासे पकडण्यासाठी म्हणून गेले होती दोन्ही मुले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, इयत्ता पहिली मध्ये असणारा अय्याज इनुस सनदी वय वर्षे ७ हा नेहमी प्रमाणे शाळेस जाऊन आला होता.
त्याने उपवास ही केला होता दुपारच्या वेळी नमाज पडून तो घरीच होता. तर त्याचा लहान भाऊ अफान वय ७ वर्षे हा त्याच्या आईसोबत सार्वजनिक तळ्यात धुणे धुण्यासाठी गेला होता. तर वडील हे कामासाठी जतला गेले होते.
अफान हा दुपारी २ च्या सुमारास आईसोबत घरी आला. व तो नमाज पडून आलेल्या मोठ्या भावास घेऊन जवळपास ६०० फुटांवर असलेल्या सार्वजनिक तळ्यात मासे पकडण्यासाठी घेऊन गेला. जाताना शेजारी असलेल्या शाहिद मुजावर वय ११ या मित्राला ही सोबत घेतले.
मासे पकडण्याच्या नादात अफानला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला. त्याला बुडताना पाहून अय्याज हा पुढे धावला. पण त्याला ही पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडू लागले.
या दोघांना बुडताना पाहून शाहीनने घर गाठले व त्या दोन्ही मित्रांच्या आईस ही बातमी सांगितली. दोन्ही मुलाच्या आईने तळ्याकडे धाव घेतली. शाहिद ने तात्काळ ही बातमी त्याच्या वडिलांना सांगितली. त्याचे वडील व शाहिद हे तळ्याकडे गेले. शाहिद ने दाखविलेल्या ठिकाणी त्याच्या वडिलांनी जाऊन बुडालेल्या दोन्ही मुलांना वर काढले. परंतु तो पर्यंत त्यांची प्राणज्योत मावळली होती.
याबाबत घटनास्थळावरून नागरिकांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यास माहिती दिली असता मिरज ग्रामीण चे रणदिवे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. दोन्ही मुलांना शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असून मिरज ग्रामीण चे पोलीस अधिक तपास करीत आहेत.
इनुस सनदी यांच्या दोन्ही मुलांचा असा अंत झाल्याने बेडग सह परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली