शेरीनाला शुद्धीकरणाचा प्रकल्प आराखडा सादर करा
सांगली : कृष्णा व वारणा नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची सूचना पर्यावरणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी मुंबईतील बैठकीत दिली. महापालिकेने शेरीनाला सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचा आराखडा तातडीने शासनाला सादर करण्याचे आदेशही दिले.
नदीप्रदुषणाबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधीमंडळात लक्षवेधी मांडली होती. याला उत्तर देताना केसरकर यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शुक्रवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीला आ. जयंत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे उपस्थित होते.
सांगली शहरातील शेरीनाल्यासह हरिपूर नाला व सांगलीवाडीचा नाला नदीपात्रात मिसळतो. त्यामुळे कृष्णा नदीच्या प्रदुषणात वाढ झाली आहे. नाल्यातील सांडपाण्यावर शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळात निधीची घोषणा केली आहे. त्यानुसार महापालिकेने ७८ कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा तातडीने सादर करावा. त्याला मान्यता दिली जाईल, असे आश्वासन केसरकर यांनी दिले.
नदीकाठच्या अनेक गावातील सांडपाणीही पात्रात जाते. केरळ, कर्नाटकमध्ये ग्रामीण भागात अत्याधुनिक शुद्धीकरण प्रकल्प उभारले आहेत. त्याची पाहणी करून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प जिल्हा परिषदेने राबवावेत, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी यांना केली. साखर कारखान्यामुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळाला दिले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.