गुलाबराव पाटील जन्मशताब्दी सांगता सोहळ्याला शरद पवार, एच. के. पाटील उपस्थित राहणार : २० ला कार्यक्रम... आ. मानसिंगराव नाईक,पृथ्वीराज पाटील यांची माहिती
सांगली, दि. १७ : सहकारतीर्थ गुलाबराव पाटील यांचा जन्मशताब्दी वर्ष सांगता सोहळा सोमवार, दि. २० फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी दहा वाजता येथील तरुण भारत स्टेडियमवर होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते खासदार श्री. शरद पवार आणि काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी श्री. एच. के. पाटील हे उपस्थित राहणार असल्याची माहिती सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार श्री. मानसिंगराव नाईक आणि गुलाबराव पाटील शिक्षण संकुलाचे संस्थापक, सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी आज येथे दिली.
सहकारतीर्थ गुलाबराव पाटील जन्मशताब्दी समिती आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. गुलाबराव पाटील हे जिल्हा बँकेचे शिल्पकार आहेत. तीस वर्षे त्यांनी या बँकेसाठी अध्यक्ष व संचालक म्हणून काम केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या तसेच अन्य संस्थांसाठी त्यांनी खूप काही काम केले आहे. त्यांचे हे योगदान लक्षात घेऊन त्यांना जन्मशताब्दी वर्षात आदरांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने एकमताने घेतला. बँकेच्या आवारात गुलाबराव पाटील यांचा यापूर्वीच पुतळा उभा करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती ना. नीलमताई गोऱ्हे, सांगलीचे पालकमंत्री ना. सुरेशभाऊ खाडे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराजे देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रजनीताई पाटील, खासदार संजयकाका पाटील, माजीमंत्री आमदार हसन मुश्रीफ, माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, याशिवाय मोहनराव कदम, अनिलराव बाबर, पी. एन. पाटील, सुमनताई पाटील, विक्रम सावंत, अरुण लाड, जयंत आसगावकर हे आमदार तसेच सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी उपस्थित राहणार आहेत.
ते म्हणाले, गुलाबराव पाटील यांनी सहकार, समाजकारण आणि राजकारण या क्षेत्रामध्ये अत्यंत पारदर्शक आणि अभ्यासूपणाने काम केले आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे आणि त्यासाठी सहकार चळवळीची मदत झाली पाहिजे, हा विचार त्यांनी मांडला. सहकार क्षेत्रामध्ये पारदर्शक आणि प्रामाणिक काम केले तर खूप चांगला विकास साधता येतो, हे त्यांनी दाखवून दिले. राजकारणसुद्धा त्यांनी अत्यंत स्वाभिमानाने केले. आमदार, खासदार, काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, सहकार क्षेत्रातल्या सांगलीपासून दिल्लीपर्यंतच्या विविध संस्थांवर अध्यक्ष म्हणून तसेच अन्य अभ्यास समित्यांंवर त्यांनी खूप मोठे काम करून दाखवले. त्यांचे कार्य आजही सहकारी चळवळीला प्रेरणादायी राहिले आहे. हा कार्यक्रम त्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
ते म्हणाले, या सोहळ्याच्यानिमित्ताने सहकारतीर्थ गुलाबराव पाटील यांच्या जीवनावरील 'सहकारतीर्थ' या जीवन चरित्राचे प्रकाशन तसेच सहकारतीर्थ गुलाबराव पाटील चौक नामकरण व सुशोभीकरणाचे लोकार्पण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे.
ते म्हणाले, यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल आणि बँकिंग तज्ञ विद्याधर अनासकर यांना बँकिंग क्षेत्रातील कामगिरीबद्दल सहकारतीर्थ गुलाबराव पाटील पुरस्कार तसेच सहकारतीर्थ गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कार माजी आमदार प्रा. शरद पाटील आणि सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके यांना प्रदान करण्यात येणार आहे.
ते म्हणाले, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील, अजितराव पाटील बेनाडीकर हे या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत.
ते म्हणाले, गुलाबराव पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गेल्या वर्षभरात विविध उपक्रम राबवण्यात आले. जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभाचा कार्यक्रम तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत विधान भवनाच्या मुख्य सभागृहामध्ये झाला होता.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली
------