लोकसंदेश न्यूज नेटवर्क
सांगलीच्या विमानतळासाठी विमान वाहतूक मंत्र्यांबरोबर बैठक होणे आवश्यक -- पृथ्वीराज पाटील
सांगली, दि. २७ : सांगलीच्या विमानतळासाठी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री श्री. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासमवेत एक संयुक्त बैठक लावण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी खासदार संजयकाका पाटील यांच्याशी माझी चर्चा झाली आहे, त्यांनीहे संयुक्त बैठक लावण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे, असे सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले, सांगलीसाठी कवलापूर येथे विमानतळ व्हावे, अशी मागणी सध्या जोर धरू लागलेली आहे. यापूर्वी येथे विमानतळ होते, त्यामुळे याठिकाणी विमानतळ होण्यासाठी आता सर्व तऱ्हेचे प्रयत्न होणे आवश्यक असले तरी, त्यासाठी पहिल्यांदा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबतच एक बैठक झाली पाहिजे. सध्या विमान वाहतुकीची गरज लक्षात घेता ते या गोष्टीला निश्चितच होकार देतील, यात शंका नाही. म्हणून या बैठकीकरिताच सर्व पक्ष, संघटना, व्यक्ती यांची एक सांगलीकर म्हणून एकत्रित बैठक श्री. सिंधिया यांच्याशी होणे आवश्यक आहे.
ते म्हणाले, सांगली शहराला कनेक्टिव्हिटी मिळाल्याशिवाय उद्योग व्यवसाय वाढीस वेग येणार नाही. त्यासाठी जसा आता पेठ ते सांगली आणि कोल्हापूर ते सांगली हे रस्ते हायवेला जोडले जात आहेत, तसेच पुणे - बंगळुरु हा नवीन मार्गही सांगली जिल्ह्यातून जात आहे. त्याच पद्धतीने आता सांगलीसाठी विमानतळ होणे ही गरज बनली आहे. या जिल्ह्यासाठी जागतिक कनेक्टिव्हिटी आवश्यकच आहे.
ते म्हणाले, सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात विमान वाहतुकीचे जाळे विणले जात आहे. मोठी, मध्यम आणि छोटी शहरेही विमान वाहतुकीने जोडली जात आहेत. व्यापार, उद्योगाच्या दृष्टिकोनातून तसेच शेतीमाल वाहतूक, तीर्थस्थळे आणि शैक्षणिक दृष्टिकोनातूनही विमान वाहतूक आवश्यक बनली आहे. विमान प्रवास आता सर्वसामान्य माणसाच्याही आवाक्यात आलेला आहे.
ते म्हणाले, माझा स्वतःचा अनुभव असा आहे की, एखादी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीची व्यक्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगलीत बोलवतो, तेव्हा ती पहिल्यांदा विचारते, "सांगलीला विमान कधी आहे"? तेव्हा आम्हाला विमानतळच नाही, तर विमान कुठले, असे सांगायची वेळ येते. या सगळ्यांसाठी आता विमानतळ आणि विमान वाहतूक ही गोष्ट आवश्यक बनलेली आहे. शिर्डी, तिरुपती किंवा देशभरातील अन्य धार्मिक स्थळे यासाठी हजारो लोक जात असतात, परंतु विमान नसल्यामुळे त्यांना पुण्या - मुंबईला जावे लागते. तेच जर सांगलीत उपलब्ध झाले तर ही संख्या आणखी वाढू शक्यते. सांगली जिल्ह्यामध्ये भाज्या आणि फळांच मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. येथून निर्यातही मोठ्या प्रमाणात आहे, ती जर सांगलीतूनच झाली, तर शेतकऱ्यांना त्याचा निश्चितपणे फायदा होईल.
छोटी छोटी शहरे आता विमानाने जोडली जात आहेतच, पण सांगली मात्र त्यात वंचित राहिलेली आहे. त्यामुळे कवलापूरला विमानतळ होण्यासाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न करताना केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री श्री. सिंधिया यांच्याशी चर्चा होण्यासाठीचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत, या साठी आपण सक्रिय राहू असेही श्री. पाटील म्हणाले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई /सांगली
-----