लोकसंदेश न्यूज नेटवर्क
जात पडताळणीबाबत कार्यशाळा संपन्न
सांगली, दि. 27, : सांगली जात पडताळणी समिती कार्यालयाच्या वतीने मंडणगड पॅटर्न विशेष मोहिमेंतर्गत तहसीलदार, प्राचार्य, शिष्यवृत्ती विभागाचे कर्मचारी, समान संधी केंद्राचे समन्वयक व सेतू कार्यालयाचे कर्मचारी यांच्याकरिता एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेस खानापूर तहसीलदार ऋषिकेश शेळके, कडेगाव तहसीलदार शैलजा पाटील, सांगली जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा नंदिनी आवडे, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव संभाजी पोवार, मिरज नायब तहसीलदार रवी सोनवणे, बार्टी चे प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे आदि उपस्थित होते.
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना जात पडताळणी समितीच्या अध्यक्ष नंदिनी आवडे यांनी मंडणगड पॅटर्न विशेष मोहिम कशा पद्धतीने राबविण्यात येत आहे, यासाठी महाविद्यालय, तहसीलदार कार्यालय यांची जबाबदारी व सहकार्य किती महत्वाचे आहे, यासाठी तिन्ही विभागांनी एकत्र येऊन लवकरात लवकर विद्यार्थ्यांना जातीचे दाखले व जात पडताळणी देण्याबाबत मार्गदर्शन केले. ज्या विद्यार्थ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव आहेत त्या महाविद्यालयाने सांगली जात पडताळणी समिती कार्यालयाशी संपर्क साधावा अशी माहिती दिली. यापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले.
तसेच जात पडताळणी बाबत येणाऱ्या समस्याबाबत उपस्थित प्राचार्य व संबंधित कर्मचाऱ्यांच्या समस्याचे निरासरण करण्यात आले व लवकरच महाविद्यालय स्तरावर पालकांसाठीही कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून ही मोहीम अधिक व्यापक करून अधिकाधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळवून देण्यात यावा असे सांगितले.
तहसीलदार ऋषिकेश शेळके व नायब तहसिलदार रवी सोनवणे यांनी उपस्थित जनसमुदायास जातीचा दाखला काढण्याच्या प्रकिया अधिक सुलभ पद्धतीने करण्याबाबत मार्गदर्शन केले. तहसीलदार कार्यालय, महाविद्यालय व जात पडताळणी समिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरावरील विविध महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल व सर्वतोपरी सहकार्य तहसीलदार कार्यालयाच्या वतीने करण्यात येईल असे सांगितले.
प्रास्ताविक सांगली जात पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी संभाजी पोवार यांनी केले. सूत्रसंचालन समतादूत अंकुश चव्हाण यांनी केले. आभार बार्टी चे प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांनी मानले. कार्यशाळेस तहसीलदार, महाविद्यालयाचे प्राचार्य व कर्मचारी, बार्टीचे समतादुत उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.